
‘गेल्या चाळीस वर्षांत माझ्या चारित्र्यावर कधी शिंतोडा उडाला नाही आणि तुम्ही खड्ड्यातील घाणेरडं पाणी माझ्या अंगावर उडवता?’ प्रकाशने आवाज चढवत गाडीमालक दिनेशला जाब विचारला.
खड्ड्यांपासून रहा सावध, नाहीतर करील कोणी पारध
‘गेल्या चाळीस वर्षांत माझ्या चारित्र्यावर कधी शिंतोडा उडाला नाही आणि तुम्ही खड्ड्यातील घाणेरडं पाणी माझ्या अंगावर उडवता?’ प्रकाशने आवाज चढवत गाडीमालक दिनेशला जाब विचारला.
‘चारित्र्याच्या ‘गोष्टी’ मला सांगू नका.’ दिनेशने गाडीत बसूनच प्रत्युत्तर दिले.
‘मग काय राजा- राणीच्या किंवा अकबर- बिरबलाच्या ‘गोष्टी’ सांगू का?’ प्रकाशने जशास तसे उत्तर दिले.
‘मला तुमची गोष्ट ऐकण्यात काडीचंही स्वारस्य नाही.’ दिनेशने उत्तर दिले.
‘म्हणजे ? माझ्या अंगावर घाण पाणी उडवणाऱ्यांना मी गोष्टी सांगतो, असा तुमचा समज झाला काय? मी एवढा सहनशील आणि क्षमाशील मुळीच नाही. तुम्ही माझ्या अंगावर पाणी उडवलं कसं?’ प्रकाशने म्हटले. त्यावर उत्सुकतेपोटी आपल्या अंगावर पाणी कसं उडवलं, याचं प्रात्यक्षिक करून दाखवा, असं प्रकाश म्हणत आहे, असा समज करून, दिनेशने गाडी मागे घेऊन, पुन्हा पाणी उडवून दाखवलं.
‘फार अवघड नसतं. तुम्हालाही हळूहळू जमेल.’ दिनेशने निरागस चेहऱ्याने म्हटलं. त्यावर प्रकाशच्या अंगाचा तिळपापड झाला.
‘माझी दहा हजारांची कपडे खराब झाली, याला तुम्ही जबाबदार आहात.’ दातओठ खात प्रकाश म्हणाला.
‘मी? माझा काय संबंध? या सगळ्याला महापालिका जबाबदार आहे. पावसाळ्यापूर्वी त्यांनी खड्डे बुजवायला नकोत का? त्यांनी
खड्डे बुजवले असते तर तिथं पाणी साचलं नसतं आणि ते तुमच्या अंगावरही उडालं नसतं. त्यामुळे तुम्ही महापालिकेला जाब विचारा.’
दिनेशने उत्तर दिलं.
‘महापालिकेकडे नंतर बघतो. आधी तुम्हाला त्याच खड्ड्यात घालतो.’ प्रकाशने उत्तर दिले. त्यानंतर दोन्ही बाजूंचा आवाज वाढल्याने प्रेक्षकांनी रस्त्यावर गोलाकार गर्दी केली होती. भांडणाची रंगत वाढावी म्हणून एक-दोघांनी त्यात फुणगी टाकली.
‘पंधरा हजार रुपयांची कपडे व ब्रॅंडेड कंपनीचा परफ्यूम लावून मी लग्नाला निघालो होतो. तो सगळा खर्च ‘खड्ड्यातील पाण्यात’ गेला.’ गर्दी जमा झाल्याचे पाहून प्रकाशला जोर आला होता.
‘अहो सुरवातीला तुमची कपडे पाच हजारांचे होते, नंतर ते दहा हजारांचे झाले, लोकांची गर्दी वाढल्यावर ते पंधरा हजारांचे झाले. थोडावेळ आपण असेच भांडत राहिलो तर तुमच्या कपड्यांची किंमत पंचवीस हजारांवर जाईल.’ दिनेशने म्हटले.
‘मला नुकसान भरपाई पाहिजे?’ प्रकाशने मागणी केली.
‘जाऊ द्या साहेब, थोडेफार पैसे देऊन, प्रकरण मिटवून टाका.’ गर्दीतील दोघा- तिघांनी दिनेशला समजुतीचा सल्ला दिला. त्यानंतर त्याने खिशात हात घालून वीस रुपयांची नोट काढली.
‘कपड्यांचा चांगला साबण घ्या. शक्यतो शंभर लिंबाची शक्ती असेलला घ्या. म्हणजे कपड्यांवरचेच काय पण चारित्र्यावरील डागही धुवून जातील.’ दिनेशने म्हटले.
वीस रुपयांची नोट पाहून प्रकाशने आकाश पाताळ एक केले. ‘कमीतकमी पाच हजार रुपये तरी द्या.’ त्याने मागणी केली. गर्दीतील दोघां- तिघांनीही त्याला साथ दिली. त्यानंतर बरीच वादावादी झाली. आता बहुमत प्रकाशच्या बाजूने झुकले होते. आपण फार ताणून धरले तर गर्दीचा मार खायची वेळ आपल्यावर येईल, असं दिनेशला वाटलं. शेवटी तडजोड म्हणून एक हजार रुपयांवर व्यवहार मिटला. एक हजार रुपये खिशात पडताच प्रकाशचा चेहरा उजळला. आता गर्दीही पांगली होती.
प्रकाशसह गर्दीतील दोघेजण जागेवर उभे होते.
‘या खड्ड्याशेजारी उभं राहून, चांगली कमाई होतेय. दिवसभरात पाच हजार मिळाले पण तरीही उद्या आपण दुसरीकडचा खड्डा बघू या.’ प्रकाशने असं म्हणताच त्याच्या साथीदारांनी त्याला टाळ्या देत सहमती दर्शवली.
Web Title: Sl Khutwad Writes Panchnama Pune 10th July 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..