आधीच लागलीय वाट डिजिटलने केला घात! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama

मॅडम, मी एक साधासुधा, हातावर पोट असणारा गरीब चोर आहे. पाकिटमारी यात माझे स्पेशलायझेशन आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून आमच्या जमातीवर उपासमारीची वेळ आली आहे.

Panchnama : आधीच लागलीय वाट डिजिटलने केला घात!

मा. अर्थमंत्री, भारत सरकार

विषय : डिजिटल क्रांतीमुळे चोरमंडळींची होणारी उपासमार

मॅडम, मी एक साधासुधा, हातावर पोट असणारा गरीब चोर आहे. पाकिटमारी यात माझे स्पेशलायझेशन आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून आमच्या जमातीवर उपासमारीची वेळ आली आहे. हल्ली रोख पैसे कोणी जवळ ठेवत नाही. त्यामुळे दिवसांत दहा पाकिटे मारूनही आम्हाला दहा-वीस रुपयांचीही कमाई होत नाही. पाकिटात फक्त क्रेडिटकार्ड किंवा एटीएम कार्ड सापडतात. त्याचं आम्ही काय लोणचं घालावं काय? हल्ली तर कोणीही उठतो आणि पाच-दहा रुपयांचेही गुगल पे किंवा फोन पे करतो. पाच-दहा रुपये जवळ बाळगण्याचाही लोकं आळस करू लागले आहेत. लोकांचा हा आळशीपणा आमच्या पोटापाण्यावर उठला आहे. कात्रज-शिवाजीनगर ही पीएमटीची लाइन मला सासऱ्याने हुंडा म्हणून दिली होती. एवढा मोठा हुंडा मिळाल्यामुळे चोर जमातीत माझा रुबाब वाढला होता. या लाइनवर मी पंधरा बाप्ये व वीस बाया कामावर ठेवल्या होत्या. परफॉर्मर बोनसही मी दर महिन्याला द्यायचो.

पगार, बोनस, सगळ्यांचे हप्ते देऊनही मला भरपूर फायदा व्हायचा. सगळं कसं व्यवस्थित चालू होतं. मात्र, देशात डिजिटल क्रांती आली आणि आमच्या धंद्याचे कंबरडेच मोडले. त्यामुळे नाईलाजानं मी अनेकांना नोकरीतून कमी केलं. सरकारच्या धोरणांमुळे बेरोजगारीची झळ आमच्याही धंद्याला बसली आहे. हप्ते भागवण्यासाठीही मला कर्जे काढावे लागले. सर्वसामान्य माणसं कर्ज काढून हप्ते भरतात आणि आम्ही हप्ते भरण्यासाठी कर्ज काढतो. आमच्यात आणि सर्वसामान्यांमध्ये एवढा फरक आहे. पाकीटमारीमध्ये काही मिळत नाही, असे पाहून सासऱ्यांना विनवणी करून, घरफोडीच्या धंद्यात घ्यायला लावले. एक वर्षभर ट्रेनी म्हणून काम केल्यानंतर स्वतंत्रपणे घरफोडीची कामगिरी माझ्यावर सोपवली. मात्र, पहिल्याच घरफोडीचा अनुभव फार वाईट आला. घरमालकाने घरात एक रुपयाचीही कॅश नसल्याचे सांगितले. पहिल्याच घरफोडीत अपयश मिळाल्यावर चोर जमातीत माझी बदनामी झाली असती.

सासऱ्याची इज्जत धुळीला मिळाली असती. त्यामुळे काय करावे, हे मला समजेना. मग घरमालकानेच ‘गुगल पे’चा पर्याय दिला. त्यांनी दहा हजार रुपये गुगल पेद्वारे माझ्या अकाउंटवर जमा केले. या डिजिटल क्रांतीचा असाही फायदा होतो, हे पाहून मला फार आनंद झाला. मात्र, तो फार काळ टिकला नाही. माझ्या मोबाईल नंबरवरून पोलिसांनी मला झोपेत असतानाच पकडले. त्यानंतर काही दिवस मला जेलवारीही घडली. माझा मूर्खपणा पाहून सास-याने मला घरफोडीतून बडतर्फ केले आणि मी अक्षरक्ष: रस्त्यावर आलो. कोणावरही विश्वास ठेवण्याची सध्याची परिस्थिती नाही, याची मला जाणीव झाली. हा धंदा बंद पडू लागल्याने आमच्यातील काहीजण राजकारणात गेले आहेत. चोरीच्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी राजकारणातही चांगले बस्तान बसवले आहे. ‘गोड बोलून आपले काम साधायचे’ या आमच्या पाकीटमारीतील धोरणाचा त्यांना फायदा झाल्याचे दिसून येत आहे. तसेच ‘पाकीट संस्कृती’चा लाभ त्यांनी उठवला आहे.

ता. क. : चोरीच्या धंद्यातून मी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. सध्या मी पीएमटीमध्येच आलेपाकच्या वड्या विकत आहे. ज्या पीएमटीत पाकिटमारीचा व्यवसाय केला, तिथंच आलेपाकच्या वड्या विकतोय म्हणून अनेकजण मला हसत आहेत. मात्र, ही कष्टाची कमाई मला सुखाची आणि समाधानाची झोप देत आहे, एवढं नक्की.

कळावे,

एक सुधारलेला चोर

टॅग्स :punePanchnama