वाकणार पण मोडणार नाही... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama

‘तुम्ही माझं ऐकणार आहात की नाही?’ स्नेहाने विराजला निर्वाणीचं विचारलं. ‘नाही. मुळीच नाही. मी माझ्या मनाचा राजा आहे.

वाकणार पण मोडणार नाही...

‘तुम्ही माझं ऐकणार आहात की नाही?’ स्नेहाने विराजला निर्वाणीचं विचारलं. ‘नाही. मुळीच नाही. मी माझ्या मनाचा राजा आहे. माझ्या मनाला जो निर्णय पटेल, तोच मी घेणार आणि तसंच मी वागणार. तुझ्या म्हणण्याप्रमाणे मान डोलवायला मी काय नंदीबैल आहे का? तुझ्या दबावाला मी अजिबात बळी पडणार नाही.’ विराजने ठामपणे सांगितले.

‘अहो पण...’ स्नेहाने त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. ‘आता पण-बिन काही नाही. ‘एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी, फिर तो मैं अपने आप की भी नहीं सुनता’ हा ‘वांटेड’ चित्रपटातील सलमान खानचा डायलॉगही त्याने मारला. यावर मात्र स्नेहा नाराज झाली. ‘फक्त स्वतःचंच खरं करा. बायकोचं अजिबात ऐकू नका.’ असं म्हणून ती फुरगुंटून बसली. ‘मी सांगितलं ना, मी कोणाचंच ऐकणार नाही. मी माझ्या मनाचा राजा आहे. मला वाटेल, तेच मी करणार’, असे म्हणून पाण्याने भरलेली बादली आणून, तो फरशी मन लावून पुसू लागला. थोड्या वेळापूर्वी स्नेहा आणि त्याच्यात वाद झाला होता. ‘आधी भांडी घासा व नंतर फरशी पुसा’ असं तिचं म्हणणं होतं. मात्र, याच गोष्टीचा विराजला राग आला होता. ‘मी पहिलं काय काम करायचं, हे मी ठरवणार. त्यात तुझी लुडबूड मला मान्य नाही. व्यक्तीस्वातंत्र्यावरील हल्ला मी कदापी खपवून घेणार नाही.’ असे तो तिला ताडताड बोलला होता.

मग मात्र तिने माघार घेतली. त्यामुळे विजयी मुद्रेने तो फरशी पुसू लागला. त्यानंतर त्याने बादलीभर कपडे धुतले. पंखे पुसले व सर्वात शेवटी भांडी घासली. तेवढ्यात स्नेहाने ‘एक कप चहा द्या’ असं सांगितलं. यावर त्याने संताप व्यक्त केला. ‘तू कोण सांगणार चहा करा म्हणून. मी तुझे अजिबात ऐकणार नाही.’ असे म्हणून त्याने एक कप चहाऐवजी कॉफी बनवून तिच्या हातात दिली. स्वयंपाक करतानाही विराजने तिचे मत अजिबात विचारात घेतले नाही. मघाशी त्याने आणलेली मेथी व वांग्याची भाजी त्याने केली. वामकुक्षीनंतर तिने एक कप कॉफी मागितली. त्यावेळी त्याने मुद्दाम एक कप चहा तिच्या हातात ठेवला. रात्रीसाठी ‘मटार-पनीरची भाजी करा’ असा आदेश स्नेहाने दिला आणि विराजच्या रागाचा पारा चढला.

‘मी काय करायचं, हे तू मला सांगत जाऊ नकोस. मला कळतं, काय स्वयंपाक करायचा ते.’ त्याने प्रत्युत्तर दिले. ‘तुम्ही माझं मुद्दाम काही ऐकत नाही. असं वागून तुम्ही माझा छळ करत असता. बायकोचं ऐकण्यात तुम्हाला कमीपणा वाटतो, याची मला कल्पना आहे.’ स्नेहाने रागाने म्हटले. ‘जा. तुला काय समजायचे ते समज. मी कोणाला घाबरत नाही. मी माझ्या मनाचा राजा आहे.’ विराजने पुन्हा असं म्हटल्यावर दोघांतील वाद पेटला. शब्दाने शब्द वाढत गेला. शेवटी स्नेहाने लाटणं हातात घेतल्यावर त्याची घाबरगुंडी उडाली. पटकन तो कॉटखाली शिरला. ‘तुम्ही आधी बाहेर या.’ स्नेहाने ऑडर दिली. ‘नाही. मी मुळीच बाहेर येणार नाही. हे घर माझं आहे. ही कॉटही मीच घेतली आहे. त्यामुळे तेथून बाहेर कधी यायचे, याचा निर्णय मीच घेणार. मी लगेच येईल किंवा दोन तासांनी येईल, हे मीच ठरवणार. तू सांगेल तसं ऐकायला मी काय तुझा नोकर नाही. मी माझ्या मनाचा राजा आहे.’ असे म्हणून विराज बराचवेळ तिथे थांबला.

टॅग्स :punePanchnama