टीव्हीवरच्या `धुळीचा’ वाद बायकोने ‘धुळीस’ मिळवला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama

‘टीव्हीवर किती धूळ साचली आहे. कधीतरी टीव्हीवर ओल्या फडक्याने हात फिरव. नाहीतर ते डबडं भंगारात टाकून तरी दे.’ सुमीतने आवाज चढवून म्हटल्यावर प्रणालीने रुद्रावतार धारण केला.

टीव्हीवरच्या `धुळीचा’ वाद बायकोने ‘धुळीस’ मिळवला

‘टीव्हीवर किती धूळ साचली आहे. कधीतरी टीव्हीवर ओल्या फडक्याने हात फिरव. नाहीतर ते डबडं भंगारात टाकून तरी दे.’ सुमीतने आवाज चढवून म्हटल्यावर प्रणालीने रुद्रावतार धारण केला.

‘काय म्हणालात? माझ्या माहेरच्या वस्तूंविषयी तुम्ही इतकं ‘टाकून’ बोलता. डायरेक्ट टीव्ही ‘टाकून’ देण्याविषयी सांगता. आज सायंकाळीच तुम्ही ‘टाकली’ काय?’ प्रणालीने आवाज चढवला.

‘खबरदार ! माझ्या माहेरच्यांनी दिलेल्या वस्तू व माहेरच्या लोकांविषयी काय बोललात तर..आपल्या लग्नात माझ्या बाबांनी हा टीव्ही घेऊन दिलाय. स्वतःला कधी काय घेता आलंय का? दुसऱ्यांनी घेऊन दिलं तर नावं

ठेवायला बरं येतं. माझ्या बाबांविषयी तुमच्या मनात राग आहे. त्यामुळे त्यांनी दिलेला टीव्हीही तुमच्या डोळ्यांना खुपतो. त्यामुळे काही ना काही खुसपटे काढून, तुम्ही टीव्हीला नावं ठेवता. मागे भारत-श्रीलंका क्रिकेट मॅच झाली. त्यावेळी भारत हरला, याचा दोष तुम्ही टीव्हीला दिला होतात.’ प्रणालीने डोळे पुसत म्हटले.

‘अगं टीव्हीवर धूळ साचलीय. एवढंच मी म्हणालो.’ सुमीतने दोन पावलं माघार घेत म्हटले.

‘आज धुळीवरून बोललात, काही दिवसांपूर्वी या टीव्हीमुळे खूप लाईटबिल येतंय, असं म्हणाला होतात. वाढलेल्या बिलाचं खापर तुम्ही माझ्या बाबांच्या टीव्हीवर फोडलं होतं. मुलांना कमी मार्क मिळाले, याचाही दोष तुम्ही टीव्हीलाच देता. तुमच्या डोळ्यांचा नंबर वाढला, की माझ्या बाबांच्या टीव्हीलाच जबाबदार धरता.’ प्रणालीने म्हटले.

त्यावर निमूटपणे सुमीतने ओलं फडकं घेऊन, टीव्ही पुसला.

‘तुम्ही फडक्याने टीव्ही खसाखसा पुसल्याचं मी पाहिलंय. माझ्या बाबांवरचा राग तुम्ही टीव्हीवर काढला, हे काय मला समजत नाही का?’ प्रणालीने पाय आपटत म्हटलं.

‘अगं तसं काही नाही. तुझा गैरसमज होतोय.’ सुमीतने म्हटले.

‘गैरसमज वगैरे काही नाही. मी तुम्हाला चांगली ओळखून आहे. मी म्हणून टिकले, दुसरी कोणी असती ना, केव्हाच पळून गेली असती.’ प्रणालीने नेहमीची यशस्वी कॅसेट ऐकवली.

‘तुम्हाला कसलं म्हणून व्यवहारज्ञान नाही. मी आहे म्हणून संसार निभावून नेतेय. नाहीतर तुम्ही कधीच रस्त्यावर आला असता.’

प्रणालीचा हा घाव सुमीतच्या चांगलाच वर्मी लागला.

‘तुझ्यावाचून माझं काहीही अडणार नाही. त्यामुळे इथूनपुढे तुझी मला काडीचीही मदत नको.’ असं म्हणून सुमीतने स्वयंपाकघराचा ताबा घेतला. कसाबसा स्वयंपाक करून, मुलांसह तो जेवला.

दुसऱ्या दिवशी सुमीत पहाटेच उठला. स्वतःचं आवरून, स्वयंपाक करू लागला. थोड्यावेळाने प्रशांत व अक्षताला उठवून, त्याने त्यांना अंघोळ घातली. अक्षताची वेणीफणी केली. दोघांना नाश्‍त्यासाठी पोहे करून दिले. त्यानंतर दोन्ही मुलांचे व स्वतःचाही डबा भरला. मुलांना शाळेचा युनिफॉर्म घालून, त्यांना तयार केले. ‘आम्ही काय कमी हुशार आहोत का? कोणावाचून कोणाचे काही अडत नाही. आम्ही स्वावलंबी आहोत.’ प्रणालीला ऐकू जाईल, अशा आवाजात सुमीत बोलला.

‘चला रे मुलांनो, तुम्हाला मी शाळेत सोडतो आणि मी तसाच आॅफिसला जातो. आजपासून आपण कोणावरही अवलंबून राहायचं नाही. नाही म्हणजे नाही.’ ठामपणे सुमीत म्हणाला. ते तिघेही दरवाजा उघडून बाहेर जाणार, तेवढ्यात बेडरूममधून प्रणालीचा आवाज आला. ‘अहो, आज रविवार आहे. मुलांच्या शाळेला व तुमच्या आॅफिसला आज सुटी आहे. आले मोठे स्वावलंबी ! तरी माझे बाबा म्हणत होते, तुझा नवरा.......’ प्रणालीचं पुढचं वाक्य सुमीतला ऐकू आलं नाही. तो मटकन सोफ्यावर बसला.

Web Title: Sl Khutwad Writes Panchnama Pune 3rd July 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :punePanchnama
go to top