स्क्रीन टाइम

स्क्रीन टाइम
Published on

स्क्रीन टाइम
----------
निरागसतेतली गंमत!
----------
स्मॉल वंडर (१९८५-८९)
----------
मित्रमैत्रिणींनो, माणसासारखा दिसणारा, बोलणारा, कामे करणारा ‘रोबॉट’ ही संकल्पना आता आगळीवेगळी राहिलेली नाही. पण १९८० मध्ये एखादा रोबॉट घरात राहायला आल्यावर काय काय मजा होऊ शकेल, हे नावीन्यपूर्णच होते. हीच मजा दाखवली आहे ‘स्मॉल वंडर’ या अमेरिकन मालिकेत. भारतात ही मालिका १९९० च्या दशकात इंग्लिश व हिंदीतही मोठ्या प्रमाणावर पाहिली जात असे. तुमच्या आई-बाबांकडे त्या काळी केबल टीव्ही असेल, तर त्यांना ही मालिका नक्की आठवेल. काही मालिका व चित्रपट आपण निव्वळ आनंदासाठी पाहतो, तशी ही हलकीफुलकी मालिका आहे.
----------
मालिकेची गोष्ट
जेमी हा १० वर्षांचा मुलगा आपले बाबा टेड लॉसन व आई- जोन यांच्याबरोबर राहात असतो. टेड ‘रोबॉटिक इंजिनियर’ असतात. ते गपचुप ‘व्ही.आय.सी.आय.’ (व्हॉइस इनपुट चाइल्ड आयडेंटिकल) नामक रोबॉट बनवत असतात. बाहुलीसारख्या या रोबॉटला ‘विकी’ असे नाव देऊन ते तिला घरी आणतात आणि घरातूनच तिच्यावर संशोधन करू लागतात. मात्र ते सगळ्यांना असे सांगतात की ‘विकी आमची मुलगी आहे!’ विकी संगणकीय ‘मोनोटोन’ पद्धतीने बोलते आणि कपाटात राहते. लहान असूनही तिच्या अंगात प्रचंड शक्ती असते. जड वस्तू ती सहज उचलते, ३६० अंशांत मान फिरवते आणि तिच्या डोळ्यांत लेझर असतो. लॉसन कुटुंबाच्या शेजारी ब्रिंडल पती-पत्नी आणि त्यांची मुलगी हॅरेएट हे कुटुंब राहात असते. ते तिघेही भोचक असतात! उगाच चौकशा करणे आणि नको त्या गोष्टींत नाक खुपसणे त्यांना आवडते. हॅरिएटचे बाबा ब्रँडन ब्रिंडल हे टेडच्याच कंपनीत काम करत असतात. आपल्या सहकाऱ्यांनी नोकरीच्या ठिकाणी सुचवलेल्या कल्पना चोरून त्याचे श्रेय स्वत:ला घेणे ब्रिंडल यांना आवडत असते. विकी रोबॉट आहे हे त्यांच्यापासून लपवण्यासाठी लॉसन कुटुंबाला अनेक खटपटी कराव्या लागतात. विकी नेहमी समोरच्याच्या बोलण्याचा शब्दश: अर्थ घेऊन तसे वागते आणि त्यामुळे वारंवार गोंधळ उडतो. त्यात ज्या गमतीजमती घडतात त्या या ९६ भागांच्या मालिकेत दाखवल्या आहेत. ही मालिका ‘युट्युबवर’ उपलब्ध आहे. तुम्ही आई-बाबांसह ही मालिका पाहू शकता.

काळ जुना; पण...
ही मालिका प्रदर्शित होऊन ४० वर्षे झाली आहेत. त्यामुळे त्यातील काही प्रसंग, विनोद वा वाक्यरचना तुम्हाला कालबाह्य वाटू शकतील. मात्र जर तुम्ही इंग्लिश भाषेचा सराव करत असाल, तर विविध शब्द व वाक्यरचना कानावर पडण्याच्या दृष्टीने ही मालिका पाहण्याचा नक्कीच उपयोग होईल.
----------
काही चांगली मूल्येही
- विकी रोबॉट असल्याने तिला स्वत:चे विचार नाहीत. तिचा हा निरागसपणा आणि माणसांचे आपल्या फायद्यासाठीचे खोटे वागणे, यांतील विरोधाभास या मालिकेत अनेकदा दिसतो.
- लॉसन यांची ती मुलगी नसूनही ते तिला मुलीसारखेच प्रेमाने वागवतात. रक्ताच्या नात्यापलीकडे त्यांचे नाते तयार होते.
- विकी हळूहळू कुटुंबाविषयीची आपुलकी आणि माणुसकी शिकत जाते. ही मूल्ये आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाची असतात.
--------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com