स्मार्ट सिटीचे दोन ‘डीपीआर’ मंजूर

स्मार्ट सिटीचे दोन ‘डीपीआर’ मंजूर

पिंपरी - स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या एरिया बेस्ड्‌ डेव्हलपमेंट आणि पॅन सिटीअंतर्गत पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर परिसरात कामे करण्यासाठीच्या दोन डीपीआरला (सविस्तर प्रकल्प आराखडा) पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या शुक्रवारच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्या अंतर्गत सुमारे २५५ कोटी रुपयांची कामे एल अँड टी कंपनीच्या माध्यमातून केली जाणार आहेत.

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालकांची बैठक महापालिका आयुक्त तथा स्मार्ट सीटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या दालनात झाली. अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते. बैठकीत या दोन डीपीआरचे सादरीकरण करण्यात आले. त्यास आयुक्त हर्डीकर, स्मार्ट सिटीचे संचालक महापालिकेतील पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, विरोधी पक्षनेते दत्ता साने, मनसेचे गटनेते सचिन चिखली, शिवसेनेचे प्रमोद कुटे, अतिरिक्त पोलिस आयुक्त मकरंद रानडे, पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे आदी उपस्थित होते.

बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत आयुक्त हर्डीकर म्हणाले, ‘‘स्मार्ट सिटी योजनेसाठी पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर भागाची निवड केली आहे. पॅन सिटी आणि एरिया बेस्ड्‌ डेव्हलपमेंट या दोन उद्देशानुसार कामे सुरू आहेत. त्यासाठी केंद्र सरकारकडून २९१ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. कामांना गती देण्यासाठी सुमारे २५५ कोटी रुपयांची निविदा मंजूर केली आहे.

त्यामध्ये फायबर ऑप्टिक केबल टाकणे, त्यासाठी डक्‍ट तयार करणे, पथदिव्यांसाठी स्मार्ट खांब उभारणे, वायफाय यंत्रणा, अशी कामे केली जाणार आहेत. त्यांचा कालावधी एक वर्षांचा असून, पाच वर्षांसाठी देखभाल, दुरुस्ती करण्याची जबाबदारी एल अँड टीची असेल.’’

पिंपरी-चिंचवडचा ४१ वा क्रमांक
केंद्र सरकारच्या माध्यमातून स्मार्ट सिटी कंपनीत कर्मचारी व अधिकाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. स्मार्ट सिटीचे कार्यालय निगडीतील संत तुकाराम व्यापारी संकुलातील अस्तित्व मॉल इमारतीत सुरू करण्याचे विचाराधीन आहे. स्मार्ट सिटी योजनेतील शहरांमध्ये देशात पिंपरी-चिंचवड ४१ व्या क्रमांकावर आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

५८ विभागांसाठी डीपीआर
शहराचा जीआयएस (जिऑग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टिम) अर्थात भौगोलिक माहिती व्यवस्था आणि विविध विभागांचे एकत्रीकरण करणे, अशा दोन डीपीआरला बैठकीत मंजुरी देण्यात आली. नागरिकांना चांगली सेवा देणे, सेवेची कार्यक्षमता वाढविणे, वित्त व्यवस्थापन प्रभावी व पारदर्शी करण्यासाठी ‘जीआयएस’चा उपयोग होणार आहे. तसेच, स्मार्ट सिटीची आर्थिकता, मालमत्ता, मानवसंसाधन, व्यवस्थापन, करप्रणाली, पाणी योजना, प्रशासन आदी ५८ विभागांसाठीचा डीपीआर आहे.

२२ किलोमीटर रस्त्यांचा विकास
पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर भागातील बीआरटी मार्ग सोडून २२ किलोमीटरचे रस्त्यांचा विकास, सायकल ट्रॅकची दुरुस्ती, पथदिवे, सेवावाहिन्या आणि दोन उद्याने विकसित करून वृक्षारोपण अशी कामे केली जाणार आहेत. लघुशंकेसाठी, लघुशंका व शौचालय आणि शौचालयासह एटीएम सेंटर, जनरल स्टोअर्स, मेडिकल स्टोअर्स, अशी तीन प्रकारची स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत.

दृष्टिक्षेपात स्मार्ट कामे
७५० किलोमीटर - फायबर केबल 
२७० - वायफाय झोन  
५० - स्मार्ट किऑस्क 
 ६० - परिवर्तन संदेश फलक
 ८०० - पथदिवे खांब 
 ५८ - आयटी संगणक प्रणाली 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com