पिंपळे गुरव भागाचा बदलणार लवकरच लूक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मे 2019

पर्यावरणासाठी सायकल 
या भागात गतवर्षी ‘पब्लिक बायसिकल शेअरिंग’ उपक्रम सुरू करण्यात आला. नागरिकांनी स्वत:च्या सायकली वापरण्यास उद्युक्त व्हावे, यासाठी सायकल ट्रॅक विकसित करण्यात येणार आहेत. त्यामुळे इंधन बचतीबरोबरच पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत होणार आहे. पादचाऱ्यांना सुरक्षितपणे ये-जा करण्यासाठी स्वतंत्र ट्रॅक असणार आहे. वाहने लावण्यासाठी पार्किंगची सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

पिंपरी - स्मार्ट सिटीच्या पहिल्या टप्प्यात पिंपळे गुरव आणि पिंपळे सौदागर भागाचा विकास करण्यात येणार असल्यामुळे या परिसराचा लूक लवकरच बदलणार आहे. 

या भागात छोटेखानी जंगल, दोन उद्याने आणि सायकल ट्रॅक असले. त्यासाठी ३४४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार सून दीड वर्षात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. एरिया बेस्ड डेव्हलपमेंटअंतर्गत (एडीबी) पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनीच्या वतीने ही विकासकामे करण्यात 
येणार आहेत. 

पुण्यातील औंधच्या धर्तीवर पिंपळे गुरव आणि पिंपळे सौदागरचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. रस्त्याच्या कडेलाच दोन ते अडीच मीटर जागासोडून सायकल ट्रॅक असेल. वड, चिंच, पिंपळ, आंबा, बाभूळ झाडे लावून जंगल तयार करण्यात येईल. तसेच उद्यानांमध्ये मुलांसाठी नावीन्यपूर्ण खेळणी, विविध प्रकारची झाडे लावण्यात येणार आहेत. 

या भागातील नऊ ते ३० मीटर रुंदीच्या रस्त्यांवर सायकल ट्रॅक करण्यात येतील. २१ प्रशस्त वातानुकूलित शौचालये आणि स्वच्छतागृहे बांधण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे बॅंकांचे एटीएम, कॉफी सेंटर, जाहिरात केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यातून महापालिकेला उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होणार आहे. 

त्याचप्रमाणे सुमारे ७५० किलोमीटर अंतराच्या परिसरात ऑप्टिकल फायबर केबल नेटवर्कच्या कामास सुरवात केली आहे. त्याचा आदेश बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्‍शन कंपनीला दिला.

या कामास स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाने २१ डिसेंबर २०१८ ला मंजुरी दिली होती. या कामासाठी पात्र ठरल्याने शिर्के कंपनीला काम देण्यास २८ फेब्रुवारी २०१९ ला मंजुरी दिली. त्यानंतर कंपनीसमवेत करारनामा करून कामाचा आदेश देण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Smart City Pimple Gurav Look Change