पिंपळे सौदागरला साकारणार ग्रामसंस्कृती

पीतांबर लोहार
सोमवार, 31 डिसेंबर 2018

पिंपरी - स्मार्ट सिटीअंतर्गत समावेश झालेल्या पिंपळे सौदागर गावठाणाचे रूप लवकरच पालटणार आहे. येथील प्राचीन मंदिरे व पवना नदी किनाऱ्यासह लगतच्या ३.२ एकर जागेवर ग्रामीण व शहरी संस्कृतीचा संगम घडवून आणणारे सांस्कृतिक केंद्र स्मार्ट सिटीअंतर्गत उभारण्यात येणार आहे. त्याचा आराखडा तयार केला आहे. 

पिंपरी - स्मार्ट सिटीअंतर्गत समावेश झालेल्या पिंपळे सौदागर गावठाणाचे रूप लवकरच पालटणार आहे. येथील प्राचीन मंदिरे व पवना नदी किनाऱ्यासह लगतच्या ३.२ एकर जागेवर ग्रामीण व शहरी संस्कृतीचा संगम घडवून आणणारे सांस्कृतिक केंद्र स्मार्ट सिटीअंतर्गत उभारण्यात येणार आहे. त्याचा आराखडा तयार केला आहे. 

पिंपळे सौदागरला पवना नदीचा निसर्गरम्य किनारा लाभला आहे. त्याच्या तीरावर पुरातन महादेव मंदिर, शिव मंदिर आणि श्रीदत्त मंदिर आहे. त्यांच्या दक्षिणेला रहाटणी- पिंपळे सौदागर लिंक रस्ता आहे. रस्त्याच्या दक्षिणेस गावठाण आहे. गावठाणात खंडोबा मंदिर, हनुमान मंदिर, दत्त मंदिर व म्हसोबा मंदिर आहे. त्याशेजारी पश्‍चिमेस मोकळी जागा आहे. या सर्व क्षेत्राचा विकास करून सांस्कृतिक केंद्र उभारणीचे नियोजन आहे. केंद्रांच्या परिसरात देशी वृक्षांसह शोभेच्या झाडांची लागवड केली जाणार आहे. विद्युत रोषणाई व अंतर्गत सजावट केली जाणार आहे. 

सांस्कृतिक केंद्राचे क्षेत्र 
पिंपळे सौदागर गावठाणालगत रहाटणी ते पिंपळे सौदागर लिंक रस्ता आणि शिव साई रस्त्यालगत ३.२ एकर क्षेत्राचा निमूळता भूखंड आहे. त्यावर सांस्कृतिक केंद्र उभारण्याचे नियोजन आहे. भूखंडाची पश्‍चिम बाजू ११५ मीटर व पूर्व बाजू ११६ मीटर लांब आहे. दक्षिणेकडील बाजू १२५ मीटर व उत्तरेकडील बाजू ९३ मीटर रुंद आहे. पूर्वेस शिव साई रस्ता व उत्तरेस रहाटणी- पिंपळे सौदागर लिंक रस्ता आहे. 

शहरीकरणामुळे गावाचा कायापालट होतो आहे. रस्ते मोठे झाले आहेत. बिल्डिंग बांधल्या आहेत. पण, लोकांना पोटभर जेवण मिळायला पाहिजे. चांगले जगता यायला पाहिजे. त्यासाठी महागाईवर नियंत्रण ठेवायला पाहिजे. 
- दामुअण्णा काटे, ज्येष्ठ नागरिक, पिंपळे सौदागर 

पिंपळे सौदागर येथे सांस्कृतिक केंद्र उभारण्याचे नियोजन आहे. त्याचा आराखडा तयार आहे. त्यामध्ये नागरिकांच्या आवडीनुसार शास्त्रीय नृत्य, लोकनृत्य, भजन, कीर्तनासाठी स्वतंत्र दालने असतील. पारंपरिक खेळ, कुस्ती आखाडा असेल. 
- निळकंठ पोमण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी 

सांस्कृतिक केंद्रातील सुविधा 
 जीवनशैली : भजन, कीर्तन, आधुनिकता 
 उत्सव : गणपती, नवरात्र, दहीहंडी, रंगपंचमी 
 कला : गायन, वादन, नृत्य, लोककला 
 क्रीडा : पारंपरिक खेळ, जिम्नॅस्टिक, कुस्ती, कबड्डी 
 वास्तूशिल्प ः वाडासंस्कृती, ऐतिहासिक वास्तूंचे जतन 

Web Title: Smart City Pimple Saudagar Cultural Center