ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे रुग्णालयात दाखल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 सप्टेंबर 2019

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना थकव्याबरोबरच; सर्दी आणि "व्हायरल इन्फेक्‍शन' झाल्याने आज येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.

शिरूर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना थकव्याबरोबरच; सर्दी आणि "व्हायरल इन्फेक्‍शन' झाल्याने आज येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. अण्णांची प्रकृती स्थिर असून, त्यांना आरामाची आवश्‍यकता असल्याचे त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. धनंजय पोटे यांनी सांगितले. 

गेल्या दोन - तीन दिवसांपासून सर्दी - खोकला झाल्याने व त्यातच ताप आल्याने आज दुपारी बाराच्या सुमारास अण्णांना येथील "वेदांता हॉस्पिटल' मध्ये दाखल करण्यात आले. नियमित उपचारांबरोबरच; न्यूमोनियाची लक्षणे आढळल्याने तसे उपचार केले जात असल्याचे डॉ. पोटे यांनी सांगितले. अण्णांच्या सर्व तपासण्या केल्या असून, रिपोर्ट "नील' असले तरी थकव्यामुळे अशक्तपणा आल्याने अण्णांना दोन दिवस विश्रांतीसाठी दाखल करून घेतले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, अण्णांची प्रकृती स्थिर असून, डॉ. पोटे, डॉ. हेमंत पालवे व डॉ. आकाश सोमवंशी यांच्या निगराणीखाली त्यांना ठेवण्यात आले असून, उद्या "डिस्चार्ज' दिला जाण्याची शक्‍यता आहे, असे राळेगणचे माजी उपसरपंच लाभेश औटी यांनी "सकाळ' ला सांगितले. अण्णांना विश्रांतीची गरज असल्याने कुणीही रूग्णालयात भेटण्यासाठी येऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Social Activist anna hazare admitted in Hospital