सहकार दरबारमुळे सोसायट्यांचे प्रश्‍न मार्गी

सुधीर साबळे
सोमवार, 21 जानेवारी 2019

पिंपरी - सहकारी गृहरचना संस्थांमध्ये सभासदांकडून देखभाली दुरुस्तीचा खर्च वसूल करताना येणाऱ्या अडचणी...पार्किंगमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी...अशा अनेक समस्या गृहनिर्माण संस्थांसमोर उभ्या असतात. मात्र, प्रत्येक महिन्याला शहरातील विविध भागांमध्ये भरवण्यात येणाऱ्या सहकार दरबारामुळे शहरातील सोसायट्यांमधील प्रश्‍न मार्गी लागले आहेत. 

पिंपरी - सहकारी गृहरचना संस्थांमध्ये सभासदांकडून देखभाली दुरुस्तीचा खर्च वसूल करताना येणाऱ्या अडचणी...पार्किंगमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी...अशा अनेक समस्या गृहनिर्माण संस्थांसमोर उभ्या असतात. मात्र, प्रत्येक महिन्याला शहरातील विविध भागांमध्ये भरवण्यात येणाऱ्या सहकार दरबारामुळे शहरातील सोसायट्यांमधील प्रश्‍न मार्गी लागले आहेत. 

गेल्या वर्षी जानेवारीपासून आतापर्यंत पिंपरी-चिंचवडमधल्या अनेक भागांमध्ये २४ सहकार दरबार भरवले. त्यामध्ये २०० पेक्षा अधिक तक्रारीचे निराकरण केले, अशी माहिती पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाचे सदस्य चारुहास कुलकर्णी यांनी ‘सकाळ’ला दिली.  या दरबारामध्ये पिंपळे-सौदागर, पिंपळे गुरव, चाकण, मोशी, वाकड, रावेत या भागांतील गृहरचना सोसायट्यांनी सहभाग घेतला होता. 

आतापर्यंतच्या सहकार दरबारामध्ये सर्वाधिक तक्रारी या सोसायटी देखभाल दुरुस्तीसाठी सभासदांकडून न येणाऱ्या पैशांसदर्भात आल्या होत्या. जे सभासद ही रक्‍कम भरत नव्हते, त्यावर काय करायचे, याचे कायदेशीर मार्गदर्शन करण्यात आले. त्यापैकी काही जणांनी या संदर्भात सहकार उपनिबंधकांकडे लेखी तक्रारी केल्या आहेत, तर काही जणांनी न्यायालयात जाण्याचे ठरवले आहे. देखभाल दुरुस्तीच्या रक्‍कम वसुलीसंदर्भात येणाऱ्या तक्रारींचे प्रमाण सर्वाधिक आहे. परंतु, काही सोसायट्यांचे प्रश्‍न सुटले असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. 

वाहनांच्या संख्येमुळे सोसायट्यांमध्ये पार्किंगचा प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे. आपल्या पार्किंगमध्ये पट्‌टे मारलेले असताना,  काही सदस्य आपल्या भागामध्ये वाहन लावतात. इथपासून ते दुचाकी लावायला जागा मिळत नाही, अशा आशयाच्या ७० ते ८० तक्रारी सहकार दरबारात आल्या होत्या. या सर्व तक्रारी ऐकून घेऊन त्यावरचा उपाय सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आला. अनेकांनी त्याचा अवलंब केला आणि त्यांना फायदा झाला.

याखेरीज अपार्टमेंट ऑफ असोसिएशन डीड असणाऱ्या सहकारी गृहनिर्माण सोसायटी करताना कोणती प्रक्रिया करावी लागते, कर भरण्याच्या बाबतीत अनेकांना समस्या असतात, त्याबाबतचे कायदेशीर मार्गदर्शन करणे, सहकारी गृहरचना सोसायट्यांच्या निवडणूकप्रक्रियेतील बदलासंदर्भात कायदेशीर माहितीही देण्यात आली.

सहभागी होण्याचे आवाहन 
सहकारी गृहरचना सोसायट्यांमध्ये अनेक प्रश्‍न असतात. अनेकदा नेमके कायदेशीर मार्गदर्शन कुठे मिळेल, याची माहिती त्यांना नसते. प्रत्येक महिन्याला होणाऱ्या सहकार दरबारामध्ये सोसायट्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले, तर त्यावर त्यांना उपाय मिळू शकतो. त्यामुळे शहरातील अधिकाधिक सहकारी गृहरचना सोसायट्यांनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन महासंघाकडून करण्यात आले आहे.

Web Title: Society Issue

टॅग्स