

PNE26W49295
फोटोओळ :
सोलापूर : गणपती घाटावरील विसर्जन कुंडातील पाणी.
गणपती घाटावरील विसर्जन कुंडाचे पाणी गेल्या वर्षीचे?
महापालिका प्रशासन अन् महापौरांवर दुर्लक्षाचा शिवसेना ठाकरे पक्ष, मनसेचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १३ : गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात होत असतानाच गणपती घाटावरील विसर्जन कुंडाच्या अवस्थेने महापालिकेच्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. कुंडातील पाणी गेल्या वर्षीपासून बदललेले नाही, तसेच आजोरा हटविण्यात आलेला नाही, असा आरोप शिवसेना ठाकरे पक्ष, मनसे तसेच मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केला. विसर्जनस्थळी गंभीर परिस्थिती असून दीड दिवसांच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनापूर्वी मनपाने तातडीने स्वच्छता करून कुंडातील पाणी बदलावे, अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी विसर्जन कुंडाचा प्रश्न ऐरणीवर आल्याने महापालिका प्रशासनाकडून कोणत्या उपाययोजना केल्या जातात, याकडे लक्ष लागले आहे. याप्रसंगी सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे कार्यवाह संजय शिंदे, रणजीत गडमिरे, अमित लाड, हिंदू संघटनेचे पदाधिकारी व गणेशभक्त उपस्थित होते.
-----------------------
‘हा आजोरा महापौरांच्या कक्षात टाकू’
गणपती घाटावरील अस्वच्छतेकडे महापौर व प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. गणेशोत्सवापूर्वी पाहणी होऊनही एक टोपलीदेखील आजोरा हटविण्यात आलेला नाही. नेत्यांच्या घरातील कार्यक्रमांसाठी स्वच्छता केली जाते; मग गणपती घाटाकडे दुर्लक्ष का, असा सवाल करत आजोरा हटविला नाही, तर तो महापौरांच्या कक्षात टाकू, असा इशारा महानगरप्रमुख महेश धाराशिवकर यांनी दिला.
-----------------------
‘विसर्जनापूर्वी पाणी बदलावे’
आज गणेशस्थापना झाल्यानंतर परवा दीड दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. मात्र, विसर्जन कुंडातील पाणी गेल्या वर्षीचे असून ते विषारी झाले आहे, असा दावा मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिषेक रामपुरे यांनी केला. विसर्जनापूर्वी कुंड स्वच्छ करून पाणी बदलले नाही, तर प्रशासनाला ‘मनसे स्टाईल’ने उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.
-----------------------
‘मनपाच्या दारात जनआंदोलन’
शांतता समितीच्या बैठकीनंतर महापौरांनी गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी बैठक घेतली होती. तरीही प्रत्यक्ष विसर्जनस्थळी परिस्थिती गंभीर आहे. गणेशोत्सव सुरू झाला तरी सत्ताधाऱ्यांना याचे गांभीर्य नसल्याचा आरोप मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे कार्याध्यक्ष विजय पुकाळे यांनी केला. महापालिकेने तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर महापालिकेच्या दारात जनआंदोलन उभारू. त्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची असेल, असा इशाराही त्यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.