सोलापुरमधील टोळीकडून पैशाच्या वसुलीसाठी तरुणाचे भरदिवसा अपहरण | Solapur crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kidnaping

सोलापुरमधील टोळीकडून पैशाच्या वसुलीसाठी तरुणाचे भरदिवसा अपहरण

पुणे : वैयक्तीक कारणासाठी हातऊसने घेतलेले पैसे वेळेत न दिल्याच्या कारणावरुन एका नोकरदार तरुणाचे टोळक्‍याने रविवारी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखुन पुणे पोलिसांच्या युनीट पाचच्या पथकाने अवघ्या चार तासातच तरुणाची सुटका करून अपहरण करणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्या. हि घटना रविवारी सकाळी अकरा वाजता हडपसरमधील शेवाळवाडी परिसरात घडली होती.(kidnapping news)

दिपक मोहन ताकतोड (वय 32), छगन विठ्ठल जगदाळे (वय 33), भगवान दत्तु शिंदे (वय 48), विशाल नानासाहेब सावंत (वय 35), विजय सिद्धेश्वर शितोळे (वय 27, सर्व रा. अरण,माढा, सोलापुर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अतिक तांबोळी (वय 30) असे अपहरण करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तांबोळी याचा साडू सादीक सलीम शेख (वय 32, रा. हडपसर) याने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरुन हडपसर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिक तांबोळी हा खासगी कंपनीमध्ये नोकरी करतो. अतिक हा काही वर्षांपुर्वी सोलापुरमध्ये राहात होता. त्याने तेथील छगन जगदाळे याच्याकडून 20 हजार रुपये हातऊसने घेतले होते. त्यातील 15 हजार रुपये त्याने परत केले होते. तरीही जगदाळे हा अतितकडे एक लाख रुपयांची मागणी करीत होता. दरम्यान, अतिक पुण्यात आला. रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अतिक व फिर्यादी हे दोघेजण एका लग्नासाठी जात होते. शेवाळवाडी पेट्रोल पंपावर ते गाडीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी गेले. त्यावेळी कारमधून आलेल्या व्यक्तींनी अतिक यास जबरदस्तीने कारमध्ये बसवून त्याचे अपहरण केले.

हा प्रकार फिर्यादीने पाहीला. त्यानंतर त्यांनी याबाबत तत्काळ पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. दरम्यान, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक प्रसाद लोणारे व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी तांबोळी यांच्या मोबाईलचा लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ते नाना पेठेत आढळून आले. पोलिसांनी तांत्रिक विश्‍लेषणाचा आधार घेत नाना पेठ गाठले. तेथे त्यांना अपहरणकर्त्यांची गाडी सापडली. त्यावेळी पाच जण गाडीमध्ये होते, पोलिसांनी त्यांना अटक करून अतिकची सुटका केली. पोलिसांनी आरोपींना पुढील कारवाईसाठी हडपसर पोलिसांकडे दिले. आरोपींपैकी ताकतोड व सांवत यांच्या विरुद्ध शरिराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत. तर भगवान शिंदे हा 2010 मधील एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून तो कारागृहात होता. कोरोना कालावधीत तो पॅरोलवर बाहेर आला होता, त्यानंतर त्यांनी हा गुन्हा केला. सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रसाद लोणारे, पोलिस कर्मचारी प्रमोद टिळेकर, महेश वाघमारे यांच्या पथकाने हि कारवाई केली.

Web Title: Solapur Gang Kidnapping Pune Crime Branch News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top