सोलापूर महामार्ग होतोय धोकादायक  

कृष्णकांत कोबल
गुरुवार, 21 जून 2018

मांजरी - येथील पुणे-सोलापूर महामार्गावर पसरलेली माती, वाळू, साचलेले सांडपाणी, अवजड वाहनांचे अनाधिकृत पार्किंग आणि विविध व्यवसायिकांनी थेट महामार्गावरच केलेल्या अतिक्रमणामुळे या ठिकाणी दिवसेंदिवस अपघाताचा धोका वाढत आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागासह वाहतूक पोलिसांचेही मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे.

मांजरी - येथील पुणे-सोलापूर महामार्गावर पसरलेली माती, वाळू, साचलेले सांडपाणी, अवजड वाहनांचे अनाधिकृत पार्किंग आणि विविध व्यवसायिकांनी थेट महामार्गावरच केलेल्या अतिक्रमणामुळे या ठिकाणी दिवसेंदिवस अपघाताचा धोका वाढत आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागासह वाहतूक पोलिसांचेही मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे.

येथील रविदर्शन चौक ते कवडीपाट टोलनाका या सुमारे पाच किलोमीटर दरम्यानचा महामार्ग सध्या विविध समस्यांनी ग्रासलेला दिसत आहे. रविदर्शन चौकात पावसाचे पाणी साठून राहत असल्याने वारंवार वाहतूक कोंडी होत असते. या संपूर्ण मार्गाच्या दोन्हीही बाजूने स्थानिक व्यवसायिकांसह हातगाडीवर व पथारी टाकून व्यवसाय करणाऱ्यांनी थेट महामार्गावरच आपले व्यवसाय थाटलेले आहेत. आकाशवाणी पंधरानंबर परिसरात तर तेथील रहिवाशांनी फूटपाथसह रस्त्यावर लाकूड फाटा, वीटवाळू, घरातील इतर साहित्य रचून ठेवलेले दिसते. अनेक व्यवसायिकांकडून दुकानातील वस्तू, ग्राहकांना आकर्षित करणारे फलक महामार्गावर आणून ठेवले जातात. खरेदीसाठी येणारे ग्राहक बिनदिक्कतपणे महामार्गावर वाहने ऊभी करून खरेदी करीत असतात. आकाशवाणी परिसरात प्रवासी वाहतूक करणारी वाहने रात्रंदिवस राजरोसपणे महामार्गावर ऊभी राहत असतात. वाहने व प्रवाशांच्या गर्दीमुळे कधीकधी एक लेन सुध्दा वाहतुकीसाठी मोकळी राहत नाही. त्यामुळे सोलापूरच्या दिशेने रविदर्शन ते पंधरा नंबर पर्यंत प्रवासी व पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.

लक्ष्मीकाँलनी ते शेवाळवाडी बसडेपो दरम्यान महामार्गाच्या दोन्हीही बाजूला कंटेनर, वाळू व रेडीमिक्स काँक्रीट वाहतूक करणारी अवजड वाहने रात्रंदिवस पार्क केलेली असतात. त्यातून सांडलेली वाळू, माती, सिमेंट, खडी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पसरलेली आहे. त्यावरुन घसरून अनेकदा छोटे मोठे अपघात होत आहेत. शेजारीच थेट मार्गावर मांजरी ग्रामपंचायतकडून कचरा संकलनासाठी कुंड्या ठेवलेल्या आहेत. त्याच्या भोवतीही कायम मोठ्या प्रमाणात कचरा साठून पसरत आहे. येथून गेलेली सांडपाणी वाहिनी नादुरुस्त असल्याने सांडपाणी महामार्गावर साचले जाते. पावसाळी ड्रेनेजलाईनही नादुरुस्त असल्याने पावसाचे पाणीही रस्त्यावर साचून राहत आहे. त्यामुळे येथे वारंवार अपघात सदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे.

पालिका हद्दीबाहेरील महामार्गावर टोलनाक्यापर्यंत व्यवसायिकांनी दुभाजकाचा उपयोग जाहिरातबाजीसाठी करून घेतला आहे. थेट दुभाजकामध्ये डांब रोवून त्यावर फ्लेक्स लावले आहेत. त्यामुळेही दोन्हीही बाजूने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने वीस दिवसांपूर्वी त्यावर कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात आजपर्यंत त्यावर काहिही कार्यवाही झालेली दिसत नाही.

महामार्गाच्या या धोकादायक परिस्थितीबाबत प्रवासी व स्थानिक नागरिकांकडून वारंवार तक्रारी केलेल्या आहेत. मात्र, महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग व वाहतूक पोलीस त्याबाबत गांभीर्याने घेत नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून प्रशासन प्रवाशांचा जीव गेल्यावरच जागे होणार काय, असा सवाल त्यांनी केला आहे.

"आम्ही कामगार व विद्यार्थ्यांना सकाळी इच्छित स्थळी पोहचण्याची घाई असते. अनेकजण मोटारसायकल व दुचाकीवरून प्रवास करीत असतात. महामार्गावर पसरलेली वाळू, सांडपाणी, माती, उभी असलेली अवजड वाहने यातून जीव मुठीत घेऊन मार्ग काढावा लागतो. वाळूवरून वाहने घसरत असतात.''
संभाजी गायकवाड, रहिवासी

"येथील दुरुस्तीच्या कामाची निविदा काढली आहे. पालखीचे प्रस्थान होण्यापूर्वी कामे पूर्ण केली जातील. अतिक्रमणांवरही कारवाई केली जाईल.''
शत्रुघ्न काटकर, सहाय्यक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

Web Title: Solapur highway is dangerous