
आळेफाटा : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाची जुन्नर तालुक्यातील अपूर्ण कामे व शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवल्याशिवाय महामार्गावरील चाळकवाडी येथील टोलनाका सुरू करू दिला जाणार नाही, असा इशारा जुन्नर मतदारसंघाचे आमदार अतुल बेनके यांनी दिला आहे. दरम्यान हीच भूमिका खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी आमदार शरद सोनवणे यांनी जाहीर केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गाची कामे अपूर्ण असताना व शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित असताना राष्ट्रीय महामार्गाच्या वतीने चाळकवाडी (ता. जुन्नर) या ठिकाणी असलेला टोलनाका आज (ता. १ रोजी) सुरू करण्यात येणार होता. या निर्णयाला तालुक्याचे आमदार बेनके यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी तीव्र विरोध केला. या मुळे टोलनाका सुरू झाला नाही.
पर्यंत पुणे नाशिक महामार्गाचे काम पूर्ण होऊन वाहतूक सुरळीत होत नाही, तोपर्यंत चाळकवाडीचा टोल नाका सुरू करु नये, अशी जोरदार मागणी करत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (नॅशनल हायवे अॅथोरिटी ऑफ इंडिया) मुख्य महाव्यवस्थापक राजीव सिंह आणि प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांना निवेदन दिले आहे.
दरम्यान, जुन्नर तालुक्याच्या हद्दीत निष्कृष्ठ दर्जाची कामे झालेली असून गेल्या दोन वर्षांपासूनच या हायवेचे काम रखडले असून, अनेक ठिकाणी उखडला गेला आहे. जागोजागी खड्डे पडलेले आहेत. जुन्नर तालुक्याच्या हद्दीमधील हायवेचा रस्ता तसेच रखडलेले पिंपळवंडीचे दोन्ही ब्रीज आणि कांदळी फाटा चौदा नंबर आणि पुढच्या ब्रीजचे साइड वे दुरूस्त व्हायला हवेत त्यालाही खूप खड्डे पडले आहेत, याची दुरूस्ती करावी अशी मागणी होत आहे.
पुणे-नाशिक महामार्गावरील बहुतेक ठिकाणी बाह्यवळण रस्ते आणि अन्य कामे अर्धवट असताना टोलवसुली केली जात होती. अखेर स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवित तीव्र आंदोलन केल्यानंतर चाळकवाडी येथील टोल नाका बंद करण्यात आला होता. दरम्यान नारायणगाव आणि खेड घाटातील बाह्यवळण रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तर अन्य चार बाह्यवळण रस्त्याचे काम नुकतेच सुरू झाले आहे. अशा स्थितीत स्थानिक नागरिकांनी जोपर्यंत महामार्गावरील काम पूर्ण होऊन वाहतूक सुरळीत होत नाही तोपर्यंत जुन्नर येथील चाळकवाडी टोलनाका उभारणीला जोरदार विरोध दर्शविला आहे. तरीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून चाळकवाडी येथील टोलनाका सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती मिळत आहे. महामार्गावरील अर्धवट कामे सुरू आहेत. स्थानिक नागरिक व माझ्यासह सर्व आमदार लोकप्रतिनिधींचा विरोध असताना हा टोलनाका सुरू केला जात आहे. त्यामुळे प्राधिकरणाने टोलनाका सुरू करण्यापुर्वी नारायणगाव आणि खेड घाट बाह्यवळण व रस्त्याची अर्धवट कामे पहिल्यांदा पूर्ण करावीत. तसेच जोपर्यंत महामार्गावरील सर्व कामे पूर्ण करून वाहतूक सुरळीत होत नाही, तो पर्यंत चाळकवाडी येथील टोलनाका सुरू करू नये. -डॉ. अमोल कोल्हे, खासदार
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे काम अपुर्ण असून, देखील चाळकवाडी येथे असलेला टोलनाका चालु करण्यात येणार आहे असे समजले. तरी या संदर्भात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना घेऊन जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून महामार्गाचे काम पुर्ण होत नाही तोपर्यंत हा टोलनाका चालू करू नये अशी मागणी केली आहे. तसेच या महामार्गाचे काम लवकरात लवकर पुर्ण करावे तसेच रस्त्यामध्ये ज्या ज्या शेतक-यांच्या जमीनी गेल्या आहेत त्यांचेही प्रश्न मार्गी लावावेत -अतुल बेनके, आमदार
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे काम पुर्ण झालेले नसताना देखील आज मध्यरात्री चाळकवाडी येथील टोल नाका चालु करण्यात आला होता, तो आम्ही रात्री बारा वाजता पुन्हा बंद करण्यात आला आहे. तसेच महामार्गाचे काम पुर्ण होत नाही तोपर्यंत टोल नाका चालु करू देणार नाही. -शरद सोनवणे, माजी आमदार
(संपादन : सागर डी. शेलार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.