esakal | ‘सोमेश्‍वर’ची लढत‘ब्रेक के बाद’ सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

‘सोमेश्‍वर’ची लढत‘ब्रेक के बाद’ सुरू

‘सोमेश्‍वर’ची लढत‘ब्रेक के बाद’ सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोमेश्वरनगर : सरकारी आदेशांमुळे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक तब्बल सहा वेळा पुढे ढकलली होती. आता राज्य निवडणूक प्राधिकरणाने सोमवारी (ता. १३) काढलेल्या आदेशानुसार सोमेश्वर कारखान्याची निवडणूक जिल्ह्यात सर्वप्रथम म्हणजे २० सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. ज्या टप्प्यावर स्थगित झाली होती, त्याच टप्प्यावरून निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे.

सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम मागील वर्षी १८ मार्चला जाहीर झाला होता. त्याच दिवशी राज्याच्या कर्जमाफीच्या नावाखाली निवडणूक पुढे ढकलली. अकरा महिन्यांनी १५ फेब्रुवारीला कार्यक्रम लागला. १५ ते २२ फेब्रुवारीपर्यंत तब्बल ६३२ लोकांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. २३ फेब्रुवारीला छाननीतून २१ जागांसाठी ५३९ अर्ज उरले. पण, २३ फेब्रुवारीला निवडणुकीस पुन्हा स्थगिती मिळाली. वारंवार ढकलाढकलीने सभासदच काय खुद्द मुदतवाढ मिळालेले संचालकही कंटाळले होते. आता मात्र निवडणुकीस हिरवा कंदील मिळाला आहे.

प्राधिकरणाने ज्यांची नामनिर्देशनप्रक्रिया सुरू झाली आहे, अशा संस्थांची प्रक्रिया स्थगित टप्प्यापासून पुढे सुरू करावी व सुधारित कार्यक्रम सादर करावा, असे आदेश बजावले आहेत. त्यानुसार सोमेश्वर कारखान्याची निवडणूक २० सप्टेंबरपासून सुरू होईल. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे हे १९ तारखेला सुधारित कार्यक्रम जाहीर करतील. सध्या अर्ज माघारीसाठी २० सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर असा चौदा दिवसांचा कालावधी राहील. ६ ऑक्टोबरला उमेदवारांची अंतिम यादी व निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. त्यानंतर १५ ऑक्टोबरला मदतान आणि १७ ऑक्टोबरला मतमोजणी व निकाल असेल, अशी शक्यता आहे. नऊ दिवसांचा निवडणूक कार्यक्रम यापूर्वीच संपला असल्याने आता फक्त पंचवीस दिवसांचा कार्यक्रम उरला आहे. त्यामुळे १५२ गावांतील तीस हजार सभासदांपर्यंत पोचण्यात इच्छुकांची आणि नेतेमंडळींची दमछाक होणार आहे.

हेही वाचा: धारावीच्या जान मोहम्मदचे 'दाऊद'शी जुने संबंध - ATS प्रमुख

सात कारखान्यांच्या निवडणुका

जिल्ह्यातील माळेगाव, विघ्नहर, संत तुकाराम, नीरा भीमा या कारखान्यांच्या निवडणुका झाल्या आहेत. सोमेश्वर कारखान्यापाठोपाठ छत्रपती, कर्मयोगी, भीमा पाटस, घोडगंगा, भीमाशंकर, राजगड या सहकारी कारखान्यांच्या निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. मात्र, आधीच प्रक्रिया सुरू झाल्याने सोमेश्वर कारखान्याची निवडणूक आहे त्या स्थितीतून सुरू होणार आहे. पण, अन्य कारखान्यांना अंतिम मतदार याद्या पुन्हा नव्याने कराव्या लागणार आहेत. त्यावर हरकती होणार आहे. त्यासाठी किमान एक महिन्याचा कालावधी लागेल. त्यानंतर प्राधिकरणाच्या सूचनांनुसार टप्प्याटप्प्याने निवडणुका होणार आहेत.

loading image
go to top