esakal | someshwarnagar : सोमेश्वर कारखान्याची आज मतमोजणी
sakal

बोलून बातमी शोधा

सोमेश्वर कारखाना

सोमेश्वरनगर : सोमेश्वर कारखान्याची आज मतमोजणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोमेश्वरनगर : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत झालेल्या मतदानाची गुरुवारी (ता. १४) मतमोजणी होणार आहे. ४१ टेबलांवर सव्वादोनशे कर्मचारी ही मोजणी करणार आहेत. दरम्यान, निकालात कोण सिकंदर ठरणार यापेक्षा राष्ट्रवादी किती मताधिक्य घेणार आणि भाजप पहिल्या प्रयत्नात किती मते खेचणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे.

सोमेश्वर कारखान्याची ही निवडणूक एकतर्फी जिंकण्याचा विश्वास राष्ट्रवादीच्या सोमेश्वर विकास पॅनेलला आहे. अशातच शेतकरी कृती समिती व काँग्रेसचे बळही त्यांच्यासोबत होते. राष्ट्रवादीला मताधिक्याचा विक्रम करायची इच्छा आहे.

हेही वाचा: जालना : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

दुसरीकडे कारखान्याच्या लढाईत प्रथमच उतरलेल्या भाजपच्या पॅनेलला आपले अस्तित्व दाखवून देत राष्ट्रवादीला धक्का द्यायचा आहे. म्हणून मतमोजणीकडे संपूर्ण साखरपट्ट्याचे, तसेच राष्ट्रवादी व भाजपच्या वरिष्ठांचेही लक्ष लागले आहे.

गुरुवारी (ता. १४) सकाळी आठपासून बारामतीतील कृष्णाई लॉन्सवर ही मतमोजणी होणार आहे. मतमोजणी वेगाने होण्यासाठी ४१ टेबल लावले असून तिथे २२० पेक्षा अधिक कर्मचारी काम करणार आहेत. दहा-पंधरा अधिकाऱ्यांचा आणि १०० पोलिसांचा फौजफाटाही नियंत्रणासाठी असणार आहे. माळेगाव कारखान्याची मतमोजणी पहाटेपर्यंत चालली होती. त्यावेळच्या नियोजनातील दुरुस्त्या प्रशासन करत आहे. आजच सर्व कर्मचाऱ्यांचे मतमोजणीच्या ठिकाणी प्रशिक्षणही घेण्यात आले आहे. त्यामुळे सकाळी अकरा ते बाराच्या दरम्यान पहिला निकाल हाती लागण्याची शक्यता असून मतमोजणी सुरळीत पार पडल्यास सायंकाळी सातपर्यंत सर्व निकाल हाती येतील, असा अंदाज आहे.

loading image
go to top