
एका मुलाचा मृत्यू, अंत्यसंस्कार मात्र दोघांवर; पुण्यातल्या घटनेने खळबळ
पुण्यातल्या एका घटनेने सध्या खळबळ माजलेली आहे. एका कुटुंबाने आपला मुलगा हरवल्याची तक्रार केली होती. मुठा नदीच्या कालव्यात पोहायला गेलेला मुलगा हरवला असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. स्वारगेट पोलिसांनी या प्रकरणात तपास केला असता, त्यांना एका मुलाचा मृतदेह आढळून आला. या कुटुंबाला या मृतदेहाची ओळख पटली, पोलिसांचे सोपस्कार झाले. हा आपलाच मुलगा असल्याचं सांगत हे कुटुंब मृतदेह घेऊन गेलं आणि त्यावर अंत्यसंस्कार केले. प्रकरण खरंतर इथून सुरू होतं. (Son drowns, But Family cremates 2 deadbodies in Pune)
हेही वाचा: पैसे द्या, नाहीतर हेलपाटे मारा!
दुसऱ्या दिवशी हडपसर पोलिसांनाही १६ वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला. त्यांनीही या कुटुंबाला माहिती दिली. या कुटुंबाने हा मुलगा आपलाच असल्याचं सांगितलं. हडपसर पोलिसांनीही ओळख पटताच सोपस्कार करून मृतदेह कुटुंबाच्या हवाली केला. त्याच्यावरही अंत्यसंस्कार झाले. यावेळी या कुटुंबाने आदल्या दिवशी घडलेल्या घटनेबद्दल पोलिसांना काहीही सांगितलं नाही. आता दोन्ही मृतदेह एकाच मुलाचे कसे असू शकतील?
हेही वाचा: आर्थिक फसवणूकप्रकरणी दोघांवर गुन्हा
याच संदर्भात माहिती घेण्यासाठी स्वारगेट पोलिसांनी या कुटुंबाला फोन केला. तेव्हा त्यांनी अजबच दावा केला. हडपसरमध्ये सापडलेला मृतदेह आपल्या मुलाचा होता आणि स्वारगेट पोलीस कोणत्या मृतदेहाबद्दल बोलतायत हे आपल्याला माहित नाही, असं या कुटुंबाने सांगितलं. त्यामुळे आता स्वारगेट पुन्हा एकदा त्या १६ वर्षीय मुलाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करतायत.
हेही वाचा: भोरवाडी येथे अपघातात एकाचा मृत्यू
दरम्यान, मुठा कालव्यातच हरवलेल्या आणखी एका १६ वर्षांच्या मुलाचा तपास सिंहगड पोलीसही करतायत. धायरीतला हा मुलगा आपल्या मित्रांसोबत कालव्याकडे फिरायला गेला होता, त्यानंतर तो गायब झाला. आता स्वारगेट पोलिसांना सापडलेला मृतदेह धायरीतल्या या मुलाचा असण्याची शंका आता सिंहगड पोलिसांना वाटत आहे. या धायरीतल्या मुलाच्या कुटुंबाला स्वारगेट पोलिसांनी आपल्याकडच्या मुलाच्या मृतदेहाचा फोटो दाखवला. पण हा आपला मुलगा नसल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. आता या प्रकरणातला सखोल तपास सुरू आहे.
Web Title: Son Drowns But Family Cremates 2 Bodies In Pune Police Confused
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..