
मांजरी येथे शनिवारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सभेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पाटील म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाने 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानंतर पुन्हा सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी 31 मार्चपर्यंत मुदत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित जिल्हा बॅंकांसह काही सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
पुणे : अडीचशेपेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुका घेण्यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. ती येत्या दोन दिवसांत जाहीर करण्यात येईल. त्यानुसार गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुका त्यांच्या पातळीवर घेण्यात येतील, अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
मांजरी येथे शनिवारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सभेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पाटील म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाने 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानंतर पुन्हा सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी 31 मार्चपर्यंत मुदत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित जिल्हा बॅंकांसह काही सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जिल्हा बॅंका, दूध संस्था, साखर कारखान्यांसह सध्या 38 सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. उर्वरित सहकारी संस्थांची निवडणूक घेण्यासाठी सहकार विभागाच्या यंत्रणेवर ताण येणार आहे. त्यामुळे निवडणुका वर्गवारीनुसार टप्प्याटप्प्याने घेण्यात येणार आहेत. त्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निवडणूक कार्यक्रमाबाबत निर्णय घेण्यात येईल.
अडीचशेपेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुका कशा घ्याव्यात, यासाठी सहकार विभागाकडून नियमावली तयार करण्यात आली आहे. ही नियमावली दोन दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. त्यानुसार सोसायटीच्या पातळीवर या निवडणुका होतील, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
राज्यातील गृहनिर्माण सोसायट्या - सुमारे एक लाख
अडीचशेपेक्षा कमी सभासद असलेल्या संस्था - 80 हजार
पुणे जिल्ह्यातील गृहनिर्माण सोसायट्या - 18 हजार
अडीचशेपेक्षा कमी सभासद असलेल्या संस्था- 15 हजार
पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करणार :
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस होत आहे. या पावसामुळे द्राक्षांसह अन्य पिकांचे नुकसान झाले आहे. या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे त्यांनी या वेळी सांगितले.