पुण्यात गणेशोत्सवात सहा रात्री बारापर्यंत ध्वनिवर्धकांना परवानगी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

गणेशोत्सवाच्या काळात चार दिवस रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिवर्धक वापरण्यास परवानगी आहे. ही परवानगी सहा दिवसांपर्यंत वाढविण्यासाठी प्रशासनासमवेत चर्चा केली जाईल, असे आश्‍वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना दिले. 

पुणे : गणेशोत्सवाच्या काळात चार दिवस रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिवर्धक वापरण्यास परवानगी आहे. ही परवानगी सहा दिवसांपर्यंत वाढविण्यासाठी प्रशासनासमवेत चर्चा केली जाईल, असे आश्‍वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना दिले. त्याचबरोबर डॉल्बी न वापरण्यासाठी आगोदर प्रबोधन करावे, त्यानंतरही न ऐकल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा आदेश पाटील यांनी पोलिसांना दिला. 

पुणे पोलिस विघ्नहर्ता न्यासतर्फे आयोजित गणेशोत्सव मंडळ देखावा स्पर्धा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पोलिस मुख्यालयात संपन्न झाला. यावेळी महापौर मुक्ता टिळक, खासदार गिरीश बापट, आमदार दिलीप कांबळे, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम, महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्त रुबल अग्रवाल, 

पाटील म्हणाले, "देशातील सद्यपरिस्थितीमुळे घातपाताची शक्‍यता लक्षात घेता देशभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे. कायद्याच्या चौकटीत राहून उत्सव साजरा करावा. कार्यकर्त्यांच्या तक्रारी लक्षात घेता, इतर दिवशी रात्रभर डॉल्बी लावणाऱ्यांवर पोलीस आयुक्तांनी कारवाई करावी. तसेच 'सनबर्न फेस्टीव्हल' सारखे उत्सव कसे चालतात, त्याची पोलिस आयुक्तांनी चौकशी करावी.'' गणेशोत्सव मंडळांनी आपल्या तक्रारी व सुचना मंत्र्यांसमोर मांडल्या. महापालिका प्रशासनाने परवानग्यांसाठी ऑनलाईन व ऑफलाईन सुविधांची मुदत आता 16 ऐवजी 20 ऑगस्टपर्यंत वाढविल्याचे सांगितले. 

पोलिस प्रशासनाने गणेशोत्सव मंडळांना कायद्याच्या चौकटीत राहून सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहपोलीस आयुक्‍त रवींद्र शिसवे यांनी केले. तर सुत्रसंचालन डॉ.मिलिंद भोई व पोलिस उपायुक्त मितेश घट्टे यांनी केले. 

"गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या भावना व सूचना लक्षात घेता उत्सव हा उत्सवाप्रमाणेच साजरा करु. उत्सव साजरा करताना कायदा सुव्यवस्थेच्या दुष्टीने गर्दी नियंत्रणासाठी मंडळांशी चर्चा केली जाईल. उत्सवामध्ये सुरक्षाही महत्वाची असणार आहे.'' 
- डॉ.के.वेंकटेशम. पोलिस आयुक्त 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sound amplifiers will allowed till 12 midnight for 6 days in Ganeshotsav