आधीच कोरोना अन् त्यात आता याची भर...

wo.jpg
wo.jpg

राजगुरुनगर : जुलै महिन्यात खेड तालुक्यात पावसाचे प्रमाण सरासरीच्या ३३ टक्के घटले असून खरिपाची पेरणी २५ टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे तालुक्यावर  दुष्काळाचे संकट घोंघावू लागले आहे. आधीच कोरोना त्यात दुष्काळ असे म्हणायची वेळ आता तालुक्यावर आली आहे.

तालुक्याचे प्रमुख पीक असलेल्या भाताची लागवड ५० टक्केच झाली असल्याने भात उत्पादन घटणार हे निश्चित आहे. तशीच परिस्थिती भुईमुगाची असून भुईमूग सरासरीच्या अवघा ३३ टक्के क्षेत्रावर पेरण्यात आला आहे. बटाटा लागवडी ७० टक्के, तर मका पेरणी ५७ टक्क्यांवरच झाली आहे. एकूण तृणधान्याची ४३ टक्के, तर कडधान्याची ६१ टक्के पेर झाली आहे. एकूणच पावसाअभावी पेरणीचे क्षेत्र घटले असून, ते खरेतर ५० टक्क्यांच्याच आसपास आहे. मात्र सोयाबीन सरासरीच्या १६२ टक्के क्षेत्रावर पेरले गेल्यामुळे आणि भाजीपाला व चारापिके जास्त पेरल्याने एकूण टक्केवारी जास्त दिसत आहे. पावसाची अनियमितता पाहून लोकांनी अनियमित पर्जन्यमानात तग धरणारे पीक म्हणून सोयाबीन पेरून ठेवले आहे. याच कारणाने तालुक्यात सोयाबीनचे क्षेत्र वाढत चालले आहे.

गेल्या वर्षी तालुक्यातील धरणे १ ऑगस्टला जवळपास भरली होती. यावर्षी चासकमानची अवस्था दयनीय असून ते अवघे १७ टक्के भरले आहे. भामाआसखेड अवघे ४२ टक्के भरले असून, छोटे असलेले कळमोडी अवघे ४६ टक्के भरले आहे. कळमोडी साधारण १५ जुलैच्या आसपास दरवर्षी भरते. यावर्षीचा कळमोडीच्या ३१ जुलैच्या साठ्याचा, गेल्या काही वर्षातील, हा नीचांक आहे. पुढे पाऊस झाला नाही तर  चासकमान धरण भरण्याची शक्यता नाही. धरण भरले नाही तर भीमा नदीवर असलेले बंधारे भरणार नाहीत, आणि एरव्ही बंधाऱ्यांच्या पाण्यावर घेण्यात येणारी रब्बी आणि नगदी पिके घेता येणार नाहीत, यामुळे खेड व शिरूर तालुक्यांतील पिकांना, विशेषतः ऊस आणि भाजीपाला पिकांना  फटका बसेल. त्यामुळे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेले शेतकरी हवालदिल झाले आहेत.

ऐन जुलैत पावसाने दडी मारल्याने आषाढधारा यावर्षी बरसल्याच नाहीत. हमखास पाऊस पडणाऱ्या तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात म्हणजेच मावळ खोऱ्यात पाऊस पडला नाही. खेड तालुक्यात आतापर्यंत अवघा ३११ मि.मी. पाऊस झाला आहे. त्यातील १८१ मि.मी. जून महिन्यातला आहे. जूनमध्ये चक्री वादळामुळे पडलेल्या पावसाचा त्यात प्रमुख हिस्सा आहे. जुलैमध्ये पडलेला पाऊस कमी तर आहेच, पण जो पडला तो वळवाच्या स्वरूपात चारदोनदा पडलेला असून, संततधार नसल्याने पिकांसाठी तो फारसा उपयुक्त ठरलेला नाही. तालुक्याची पावसाची सरासरी ६५० मि. मी. आहे. पावसाचे महिने निघून गेल्याने, सरासरी तरी पूर्ण होणार की नाही याबाबत साशंकता आहे.

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com