पुणे-सोलापूर महामार्गावरून जाताय, मग हे वाचा...

सचिन लोंढे
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांच्या वेगाला चाप लावण्यासाठी इंटरसेफ्टर कारची सोय करण्यात आल्याने महामार्ग पोलिसांना वाहनांवर दंडात्मक कारवाई करणे सोपे झाले आहे. गेल्या महिनाभरापासून इंदापूर ते भिगवण या पट्ट्यामध्ये या कारच्या माध्यमातून वेगाने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याचे सत्र सुरू आहे. आतापर्यंत एक हजार चारशे वाहनांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती इंदापूर महामार्ग पोलिस मदत केंद्राचे साहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजित अभंग यांनी दिली.

कळस (पुणे) : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांच्या वेगाला चाप लावण्यासाठी इंटरसेफ्टर कारची सोय करण्यात आल्याने महामार्ग पोलिसांना वाहनांवर दंडात्मक कारवाई करणे सोपे झाले आहे. गेल्या महिनाभरापासून इंदापूर ते भिगवण या पट्ट्यामध्ये या कारच्या माध्यमातून वेगाने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याचे सत्र सुरू आहे. आतापर्यंत एक हजार चारशे वाहनांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती इंदापूर महामार्ग पोलिस मदत केंद्राचे साहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजित अभंग यांनी दिली.

या कारमध्ये अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात आली आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून वाहनांचा वेग, काळ्या रंगाच्या काचा, अल्कोहोल तपासणी यंत्र व विनाहेल्मेट मोटारसायकलस्वाराची नोंद करण्याची व त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची सुविधा आहे. ही यंत्रणा मुंबई येथील मुख्य नियंत्रकाच्या सर्व्हरशी जोडण्यात आली असून, दिवसभर साठविलेला डाटा थेट या सर्व्हरकडे पाठविला जातो. यामध्ये वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांचे फोटो घेऊन त्यांचा वेग तपासणे व त्यांना ऑनलाइन मेसेज पाठविण्याचे काम केले जाते. याशिवाय दंडाची रक्कम त्यांना ऑनलाइन स्वरूपात भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे सोपे झाले आहे.

यंत्रणेतील सेन्सर खूपच प्रभावशाली...
प्रत्यक्ष महामार्गालगत इंटरसेफ्टर कारच्या माध्यमातून कारवाई करणाऱ्या साहाय्यक फौजदार बबन जाधव व पोलिस कॉन्स्टेबल नाथा गळवे यांनी ही यंत्रणा हाताळण्यास सोईस्कर असल्याची प्रतिक्रिया दिली. या यंत्रणेतील सेन्सर खूपच प्रभावशाली असून वेगवान वाहनांचे क्रमांक अचूकपणे टिपण्याची व त्याने मोडलेल्या नियमाची माहिती दाखविण्याची सुविधा उपलब्ध आहे. यामुळे आम्हाला कारवाई करणे सोपे झाल्याचे मत त्यांनी नोंदविले.

चारचाकींसाठी वेगमर्यादा ताशी 90 किलोमीटर आहे. दंडात्मक कारवाई झाल्यानंतर चालकांचे वाहनाच्या वेगावर नियंत्रण राहील. सध्या वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांवर 1 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या, रस्ते सुरक्षिततेत हलगर्जी दाखविणाऱ्या पन्नास ते सत्तर वाहनांवर दिवसभरात कारवाई केली जात आहे.
- अभिजित अभंग, साहाय्यक पोलिस निरीक्षक, इंदापूर महामार्ग पोलिस मदत केंद्र

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Speed Limit For Vehicles On Pune-Solapur Road