
Pune University : विद्यापीठाने दर्जेदार, नावीन्यपूर्ण संशोधनावर भर द्यावा - माजी कुलगुरू प्रा. डॉ. अरुण अडसूळ
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाव केवळ देशातच नव्हे तर परदेशातही आहे. त्यामुळे या विद्यापीठात नावलौकिकाला साजेसे संशोधन होणे गरजेचे आहे. पेटंट या मुद्यावर शून्य गूण मिळणे, म्हणजे, या विद्यापीठातील एकाही संशोधनाला गेल्या वर्षभरात एकही पेटंट मिळू शकलेले नाही.
या विद्यापीठाचा पूर्वीचा नावलौकिक पूर्ववत करण्यासाठी विद्यापीठाने दर्जेदार, नावीन्यपूर्ण, पेटंट मिळू शकेल, अशा उच्चतम संशोधनावर अधिक भर देणे गरजेचे असल्याचा सल्ला या विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि शिक्षण तज्ज्ञांनी दिला आहे.
दर्जेदार संशोधनासाठी प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरणे, संशोधनासाठी अधिकचा निधी उपलब्ध करून देणे, संशोधन हे समाजोपयोगी असणे गरजेचे आहे. सध्याच्या काळात केवळ नावापुरते संशोधन केले जात आहे. याशिवाय विद्यापीठात पूर्वी फक्त शैक्षणिक कामांवर लक्ष केंद्रित केले जात असे.
आता त्यात अशैक्षणिक कामांची मोठ्या प्रमाणात भर पडली असून, विद्यापीठीय कामकाजात अनावश्यक हस्तक्षेपही वाढला असल्याची चर्चा आहे. ही चर्चा खरी असेल तर, या गोष्टी त्वरित थांबणे गरजेचे असल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. अरुण अडसूळ यांनी सांगितले.
पूर्वी पुणे विद्यापीठात वर्षाला किमान दोनशे ते अडीचशे पेटंट मिळत असत. गेल्या वर्षभरात पेटंटसाठी शून्य गुण मिळत असतील तर याचा अर्थ पेटंटही शून्यावर आले आहेत. ही बाब विद्यापीठाच्या गुणवत्तेला आणि लौकिकाला मारक ठरणारी आहे. याला आळा घालण्यासाठी संशोधनाचा दर्जा, संशोधनासाठी आवश्यक निधी आणि पेटंटची संख्या वाढविणे आवश्यक असल्याचे माजी कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी सांगितले.
राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारीत (नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क) विद्यापीठाची मोठी घसरण झाली आहे. यामध्ये सुधारणा करण्यासाठी काय उपाययोजना करणे गरजेचे आहे, हे जाणून घेण्यासाठी माजी कुलगुरू आणि शिक्षण तज्ज्ञांची मते जाणून घेण्यात आली. यामध्ये त्यांनी या प्रमुख उपाययोजना सुचविल्या आहेत.
माजी कुलगुरू डॉ. अडसूळ यांनी सुचविलेल्या उपाययोजना
- संशोधनाचा दर्जा सुधारायला हवा
- सध्या केवळ नावापुरते केले जाणारे संशोधन थांबायला हवे
- नावीन्यपूर्ण, समाजोपयोगी आणि दर्जेदार संशोधनावर भर द्यायला हवा
- नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमाची रचना करण्यात यावी
- पेटंटची संख्या वाढविणे गरजेचे आहे.
- विद्यापीठात केवळ शैक्षणिक कामेच व्हायला हवीत
- विद्यापीठीय कामात राजकीय प्रभाव असेल तर, तो थांबवायला हवा
- अशैक्षणिक कामांना लगाम लागणे गरजेचे
माजी कुलगुरू डॉ. गाडे यांनी सुचविलेल्या उपाययोजना
- विद्यापीठाच्या क्रमवारी घसरणीच्या कारणांचा शोध घ्यायला हवा
- घसरणीची कारणे शोधण्यासाठी तातडीने एक तज्ज्ञ समिती स्थापन करावी
- समितीच्या अभ्यासातून निष्पन्न झालेल्या कारणांवर तातडीने उपाययोजना कराव्यात
- संशोधनाचा पंचवार्षिक आराखडा तयार करायला हवा.
- संशोधनासाठी निधी वाढविणे गरजेचे
- संशोधनासाठी फेलोशिप्स, स्कॉलरशिप्स देण्यात याव्यात
- नावीन्यपूर्ण म्हणजे पेटंट मिळेल, असे संशोधन व्हावे
- संशोधनासाठीचा पंचवार्षिक कृती आराखडा तयार करावा
पेटंट म्हणजे काय?
पेटंट म्हणजे संपूर्णपणे नवीन व नावीन्यपूर्ण (इनोव्हेटिव्ह) बाबींना दिलेला हक्क होय. हा हक्क व्यक्ती किंवा संस्थेला दिला जातो. या हक्कामुळे संबंधित व्यक्ती किंवा संस्थेने विकसित केलेल्या पूर्णपणे नवीन व नावीन्यपूर्ण बाबीची अन्य कोणालाही नक्कल (कॉपी) करता येत नाही. याचाच अर्थ पेटंट म्हणजे नावीन्यपूर्ण संशोधन, नवीन सेवा, तंत्रज्ञान, प्रक्रिया, उत्पादन आणि डिझाईनसाठी मिळालेला कायदेशीर हक्क होय. यामुळे पेटंट मिळालेल्या संशोधन किंवा सेवेवर संशोधन करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेची मक्तेदारी राहण्यास मदत होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जगभरात नावलौकिक आहे. हा नावलौकिक पुढेही कायम रहायला हवा. यासाठी विद्यापीठातील प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरायला हव्यात. शिवाय दर्जेदार संशोधन वाढविणे आवश्यक आहे. विद्यापीठाने संशोधनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला पाहिजे.
- प्रा. भाऊसाहेब जाधव, कार्याध्यक्ष, मराठवाडा मित्र मंडळ