

लेख तीन पानांचा, फोटो आहेत
-------------
मानवतेचे उपासक श्री सद्गुरू यशवंतबाबा महाराज
श्री यशवंतबाबा महाराज हे संत परंपरेतील एक महत्त्वाचे युगपुरुष. पंढरीच्या वाटेवर असणाऱ्या मायणीकर यशवंतबाबांचे महात्म्य आजही कायम आहे.
बाबांचे बालपण
पंढरपूरच्या पांडुरंगाच्या वाटेवर चांद नदीच्या काठावरचे मायणी आहे. येथे पंढरीच्या विठ्ठलाचा एक उपासक देश पारतंत्र्यात असताना समाजात उच्चतम मूल्यांची जोपासना करण्यासाठी १८४५ मध्ये माने-पाटील घराण्यात जन्माला आला. मायणीत भुजंगराव माने या गरीब शेतकऱ्यांच्या पोटी यशवंतबाबांचा जन्म झाला. सर्वांपासून अलिप्त राहणे, कमी बोलणे, एवढेच नव्हे तर बालवयातही खेळातही रममाण होत नसत. स्वभावाने रागीट व एकांतात राहणे त्यांना आवडत होते. मात्र, वाढलेल्या वयाबरोबर त्यांचा स्वभाव जास्तच अवलिया होऊ लागला. एकीकडे जग दुसऱ्या महायुद्धात अणुबॉम्बच्या वापराने होरपळत होते. इंग्रजांचे अत्याचार सुरू होते. तर दुसरीकडे बालवयातल्या बाबांच्या बाललीलाही पाहायला मिळत होत्या. बाबांना चिंतनाची आवड होती.
मानवतेचा साक्षात्कार
बाबा उक्तीने नव्हे, तर कृतीने संत होते. मुखी हरिनाम नाही, डोक्यावर मुंडासे, अंगात पैरण, खांद्यावर घोंगडे, हातात काठी, पायात जोडे हा ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणारा त्यांचा पोशाख होता. भविष्याचा वेध घेणारी दृष्टी त्यांना लाभली होती. प्रगल्भ चिंतन केल्याने त्यांना शाश्वत सत्याचे साक्षात्कार होऊ लागले. त्याकाळी लोकांचे आकर्षण चमत्काराकडे अधिक होते. भोळ्या भाबड्या शेतकरी वर्गाला जादूटोणा, भूतबाधा या नावाखाली लुटले जात होते. या वेळी बाबांनी मायणी परिसरात आपल्या साध्या आचरणाने समाजाला मानवता धर्म शिकवला. जातिभेदाचा सामाजिक कलंक पुसून टाकण्यासाठी त्यांनी हयातभर कष्ट घेतले. त्यांचा गोतावळ्यात अठरापगड जातीतील लोक होते. बाबांनी रंजल्या गांजलेल्यांची सेवा केली. लोकांना मानवतेच्या उच्च पातळीवर आणण्याचे सामर्थ्य परमेश्वर भक्तीत असल्याने त्यांनी चिंतन भक्ती हा भक्तीचा नवा मार्ग स्वीकारला. चिंतन भक्तीद्वारे मानव कल्याणासाठी बाबांनी देवाशी सतत संघर्ष केला. त्यांच्या अंतरी भक्तीचा धागा शेवटपर्यंत अतूट राहिला. शेवटी अंधाऱ्या वाटेला प्रकाशाचे कोंब फुटावे, त्याप्रमाणे बाबांचे जीवन उजळून निघाले.
१९३० रोजी ते पंचत्वात विलीन झाले. त्यांचे जीवन कृतार्थ झाले. या अलौकिक व सामर्थ्यसंपन्न महान योग्याची ग्रामस्थांनी चांद नदीच्या काठावर समाधी बांधली. बाबा आज इहलोकी नसले तरी बाबांचे दिव्यत्व आजही समाधी परिसरात आहे, अशी भाविकांची धारणा आहे. तळ गाभाऱ्यात शांत वातावरणातील समाधी, बाबांची चांदीची मूर्ती, विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तींचे दर्शन झाले की मन कृतार्थ व शांत होते.
ट्रस्टची स्थापना व मंदिर विकास
बाबांचे कार्य अखंड सुरू ठेवण्यासाठी माजी आमदार (कै.) भाऊसाहेब गुदगे यांनी पुढाकार घेऊन श्री यशवंतबाबा ट्रस्टची स्थापना केली. ट्रस्टच्या माध्यमातून रथाची उभारणी करून रथयात्रा सुरू केली. ट्रस्टच्या माध्यमातून समाधी परिसराच्या जीर्णोद्धाराचे काम केले. गोरगरिबांच्या मुला-मुलींचे लग्न मंगल कार्यालयाच्या हॉलमध्ये होतील, या विचाराने येथे नाममात्र देणगीत विवाहासाठी कार्यालय उपलब्ध करून दिले जाते. मंदिरासमोर सभामंडप कार्यालय बांधकामासाठी ट्रस्टने लाखोंचा खर्च केला आहे.
आकर्षक कमानी, भक्तनिवास
(कै.) भाऊसाहेब गुदगे यांच्यानंतर सामाजिक सेवेचा वसा घेतलेले त्यांचे पुत्र सुरेंद्र गुदगे यांच्या प्रयत्नातून यशवंतबाबांच्या समाधिस्थळास ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. सुरेंद्र गुदगे व पत्नी शोभना गुदगे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन मंडळातून मिळालेल्या निधीतून समाधीलगत सुसज्ज भक्तनिवास उभे राहिले. समाधी मंदिराकडे जाणाऱ्या पश्चिम व दक्षिण मार्गावर दोन आकर्षक प्रवेशद्वार कमानी उभारल्या आहेत. मुख्य बाजारपेठेतील कमानीजवळ दोन्ही बाजूस छोटेखानी दोन गाळे उपलब्ध करून ट्रस्टला हमखास उत्पन्नाचे साधन उभे केले आहे. सुरेंद्र गुदगे यांच्या प्रयत्नातूनच नव्याने दुसरे प्रवेशद्वार पूर्णत्वास गेले आहे. त्यांच्याच प्रयत्नातून रथगृहाची उभारणी केली आहे.
पंढरपूरला भक्तनिवास
श्री यशवंतबाबा महाराज यांच्या भक्तांची सोय व्हावी, त्यासाठी मुख्य पेठेतील प्रवेशद्वाराजवळ दोन खोल्या, एक हॉल असा भक्तनिवास उभारण्यात आला आहे. पंढरपूरला मायणीतून जाणाऱ्या बाबांच्या भक्तांची निवासाची व्यवस्था व्हावी, या उद्देशाने (कै.) भाऊसाहेब गुदगे व सुरेंद्र गुदगे यांच्या पुढाकाराने भक्तनिवासासाठी लाखो रुपये खर्चून पाच गुंठे जागा खरेदी केली आहे. ही जागा चंद्रभागा नदीच्या पूर्वेस असणाऱ्या ‘हरे कृष्ण हरे राम’ मंदिराजवळ आहे. या जागेत कुंपण तयार करून भक्त निवासाच्या बांधकामाचे काम सुरू करण्यात आले आहे.
ग्रामपंचायत, सद्गुरू यशवंतबाबा महाराज ट्रस्टचे चेअरमन काकासाहेब माने, सचिव द. ग. माने, विश्वस्त सुरेंद्र गुदगे, दादासाहेब कचरे, उमेश माळी, रणजित माने, आबासाहेब माने यांच्या मार्गदर्शनाखाली भजनी मंडळाच्या सहकार्याने विविध उपक्रम राबविले जातात. बाबांनी फाल्गुन वद्य पंचमीला देहत्याग केला. त्या दिवसापासून दरवर्षी दहा दिवस पुण्यतिथी उत्साहानिमित्त समाधी परिसरामध्ये भजन-कीर्तन, पालखी मिरवणूक, महाप्रसादाचे वाटप आदी उपक्रम राबविले जातात. यशवंतबाबा भजनी मंडळाच्या पुढाकाराने व भक्तांच्या सहकार्याने दरवर्षी पंढरपूर दिंडी यात्रेचे आयोजन केले जाते.
सर्वात मोठी यात्रा
..
मायणी परिसरातील प्रमुख यात्रा ही यशवंतबाबांची. तरसवाडीपासून म्हासुर्णे, कातरखटावपासून सांगली जिल्ह्यातील माहुलीपर्यंतच्या भौगोलिक क्षेत्रातील लोक मायणीच्या यात्रेसाठी आजही हजेरी लावतात. पूर्वी यात्रेत दहा-बारा सिनेमा टॉकीज, दोन-दोन तमाशे, गगनचुंबी पाळण्यासाठी प्रसिद्ध होती. बैलबाजारामुळे कर्नाटकातील खरेदीदारही मायणीच्या यात्रेस हजेरी लावत होते. अलीकडे बैलांच्या खरेदी-विक्रीचे प्रमाण कमी असले तरी यशवंतबाबांच्या यात्रेचे महत्त्व आजही कायम आहे.
कीर्तनकारांची नगरी
...
श्री यशवंतबाबा महाराजांच्या नगरीत अनेक मोठे कीर्तनकार तयार झाले आहेत. त्यात विजय महाराज शिंदे, बापू महाराज माळी, पांडुरंग महाराज माळी, प्रणव महाराज माळी, शुभम महाराज माने, गायनाचार्य उमेश माळी महाराज, सागर माळी महाराज, सुनील पिटके महाराज, बबन शिंदे महाराज, बंडा सुतार माळी, बंडा माळी महाराज, मृदंगाचार्य हरी जावीर महाराज, विनायक शिंदे महाराज, वीणेकरी भानुदास शिंदे, चोपदार बबन शिंदे महाराज यांचा समावेश आहे. भजनी मंडळाचे अध्यक्ष सुखदेव शिंदे, सचिव धनाजी माने आहेत.
-
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.