...अन्यथा कर्नाटक केंद्रशासित राज्य म्हणून घोषित करावे : सबनीस

Pune
Pune

पुणे : बाबरी मशिदीसारखा जटील प्रश्न सामंजस्याने सुटू शकतो, तर कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद का सुटू शकत नाही. कर्नाटकच्या सीमा या पाकिस्तानच्या सीमा नसून भारतातीलच एका राज्याच्या सीमा आहेत. परंतु, त्या सीमेवर नव्या हिटलरशाहीचा उगम होतो आहेे, की काय अशी शंका यावी असे वातावरण आहे. सामोपचाराने हा प्रश्न कायमचा मिटवावा अन्यथा कर्नाटक केंद्र शासित राज्य म्हणून घोषित करावे, असे मत ज्येष्ठ समीक्षक, विचारवंत आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. 

आडकर फौंडेशनतर्फे ज्येष्ठ समीक्षक, विचारवंत आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांचा जाहीर सत्कार आज करण्यात आला, त्यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. सबनीस बोलत होते.

ज्येष्ठ समीक्षक, विचारवंत आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी संमेलनाध्यक्ष पदाची धुरा हाती घेतल्यापासून गेल्या 4 वर्षात एक हजार व्याख्यानांचा अभूतपूर्व साहित्यिक विक्रम केला आहे. तसेच त्यांना 30 लाख 42 हजार रुपयांचे विक्रमी मानधन महाराष्ट्राने उदार अंतःकरणाने दिले आहे. डॉ. सबनीस यांनी त्यांच्या आयुष्यात एकूण 178 लेखकांच्या पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या आहेत. यानिमित्त या जाहीर सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ.श्रीपाल सबनीस यांचे यांचे सांस्कृतिक एकता आणि समाज राजकीय शुद्धीकरण या विषयावर व्याख्यान झाले.  

यावेळी व्यासपीठावर डॉ.डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ.पी.डी. पाटील, माजी गृहमंत्री रमेश बागवे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलतना डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले की, माणसाचा गहिवर हे माझ्यासाठी अंतिम सत्य आहे. मी स्वतःला कधीही कोणाएका पक्षाच्या, जातीच्या, धर्माच्या चौकटीत बंदिस्त करून घेतले नाही. माझ्या सद्विवेवक बुद्धीला जी बाजू पटली त्यानुसार मी माझी भूमिका घेत गेलो. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माझ्या नावाची घोषणा होताच, हे कोण श्रीपाल सबनीस असे प्रश्न उपस्थित केले गेले. अनेक पातळ्यांवर मला रोषाला, संघर्षाला आणि दबावाला सामोरे जावे लागले. परंतु, महाराष्ट्राला लाभलेल्या वैचारिक अधिष्ठानामुळे कालांतराने माझी वैचारिक भूमिका मला विरोध करणा-यांपासून सगळ्यांनीच स्वीकरली. संतांच्या प्रवाहापासून तर आदिवासींच्या प्रवाहापर्यंत वेळोवेळी सगळ्यांनीच माझ्या भूमिकेला पाठिंबा दिला. महाराष्ट्राने माझ्यावर भरभरून प्रेम केले, मी त्यांच्या कृतज्ञतेत राहू इच्छितो. 

यावेळी बोलतना प्रा.मिलिदं जोशी म्हणाले की, दिवसेंदिवस साहित्य सम्मेलन हा आनंदाचा उत्सव न राहता तो ताण-तणावाचा समारंभ बनतो आहे. याची कारणे बदलत्या सामाजिक परिस्थितीत आहेत. कधी धर्म,  कधी जात  तर कधी महापुरुष यांच्या निमित्ताने भांडणा-या मराठी समाजाची वाढती कलहप्रियता चिंताजनक आहे. विचारकलहामुळे समाजाची पावले पुढे पडतात. पण विचार नसलेला कलह फक्त आणि फक्त द्वेषच निर्माण करतो. वर्तमानावर बोट ठेवणे म्हत्वाचे आहेच, पण अलीकडे संमेलन अध्यक्षांच्या भाषणात फक्त राजकीय भाष्यच का असते ? साहित्याचे मानवी जीवनातील स्थान, सर्जनाचा प्रवास, नवे सिद्धांत यांची मांडणी का नसते असा सवाल कोणताही झेंडा खांद्यावर  न घेणारे सच्चे साहित्य रसिक उघडपणे विचारत आहेत. त्याचेही चिंतन करावे लागेल. महाराष्ट्र पुरोगामी राज्य असल्याची अफवा मी लहानपणापासून ऐकत आलो आहे. सम्मेलन अध्यक्षांची जात काढणाऱ्या महाराष्ट्राला पुरोगामी कसे म्हणायचे? सरस्वती प्रसन्न असली की पाठोपाठ लक्ष्मी येतेच पण सरस्वतीच्या दरबारात मांडलेले लक्ष्मीचे प्रदर्शन लोकांना आवडत नाही, हे ही तितकेच खरे. 

यावेळी बोलताना डॉ. पी. डी. पाटील म्हणाले की, सबनीसांच्या माध्यमातून महाराष्ट्राला एक नवा व्याख्याता मिळाला आहे. त्यांची भूमिका पारदर्शक असल्याने त्यांची आत्मीयता आणि आर्तता वेळोवेळी त्यांच्या भाषणातून अधोरेखित होते. त्यांनी कायम स्पष्टपणे आणि निर्भीडपणे त्यांचे विचार मांडले. आज संपूर्ण महाराष्ट्रातून सबनीसांना मिळत असलेले प्रेम हे त्यांनी त्यांच्या कर्तृत्वातून आहे. यावेळी रमेश बागवे आणि सचिन ईटकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आडकर फौंडेशनचे संस्थापक ऍड. प्रमोद आडकर यांनी केले. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com