

सोमेश्वरनगर, ता. १८ : ''खासगी पब्लिकेशन''च्या सराव प्रश्नपत्रिकेतील ८५ प्रश्न जसेच्या तसे आल्याने एसआरपीएफ-५ कडून सशस्त्र पोलिस शिपाई भरतीची लेखी परीक्षा रद्द करण्यात आली होती. दरम्यान, ही परीक्षा रविवारी (ता. २४) त्याच परीक्षा केंद्रावर पुन्हा नव्याने घेतली जाणार आहे, अशी माहिती एसआरपीएफचे (पुणे) पोलिस उपमहानिरीक्षक विजयकुमार मगर यांनी दिली.
राज्य राखीव पोलिस बलाच्या (गट क्रमांक ५, दौंड) यांच्या वतीने राज्यातील मैदानी चाचणीत पात्र ठरलेल्या ३३७८ उमेदवारांची लेखी परीक्षा शनिवारी (ता. २) भिगवण येथे घेण्यात आली होती. या परीक्षेतील शंभरपैकी तब्बल ८५ प्रश्न हे महाराष्ट्र पब्लिकेशनच्या ''पोलिस भरती २०२६ : ५० प्रश्नपत्रिका संच'' या पुस्तकातील ''सराव प्रश्नसंच १०'' या एकाच प्रश्नपत्रिकेतून जसेच्या तसे उचलण्यात आले. उचलेगिरी करताना क्रमवारी, पर्याय, प्रश्नोत्तराच्या चुका हेही ''कॉपी पेस्ट'' करण्यात आले. याबाबत दैनिक ''सकाळ''ने ५ व ६ मे रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. विरोधी पक्षातील नेत्यांनीही याबाबत आवाज उठविला होता.
यानंतर अपर पोलिस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) राजकुमार व्हटकर यांनी या लेखी परीक्षेची सखोल चौकशी करण्यासाठी एसआरपीएफचे पोलिस उपमहानिरीक्षक विजयकुमार मगर यांची नियुक्ती करत परीक्षा रद्द केली होती. या गोंधळानंतर मात्र एसआरपीएफच्या गट क्रमांक सात आणि एसआरपीएफच्या गट क्रमांक १४ च्या लेखी परीक्षा नेहमीपेक्षा चांगल्या पद्धतीने पार पडल्या. यामुळे गट क्रमांक पाच साठीच्या सर्व उमेदवारांचे आपली परीक्षा नेमकी कधी होणार याकडे डोळे लागले होते. दरम्यान, लेखी परीक्षा पुन्हा होणार असली तरी २ मेला झालेल्या परीक्षेतील गैरप्रकाराची सखोल चौकशी सुरूच राहणार आहे, असेही एसआरपीएफ प्रशासनाने सांगितले.
एसआरपीएफ-५ ची रद्द करण्यात आलेली लेखी परीक्षा आता पुन्हा भिगवण (ता. इंदापूर) येथील दत्तकला शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्वामी चिंचोली येथील इमारतीत ११ ते १२.३० या वेळेत होणार आहे.
- विजयकुमार मगर, पोलिस उपमहानिरीक्षक, एसआरपीएफ (पुणे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.