एसटीच्या जागांवर उभ्या राहणाऱ्या स्थानकांच्या इमारती ‘आयकॉनिक’ असाव्यात

एसटीच्या जागांवर उभ्या राहणाऱ्या स्थानकांच्या इमारती ‘आयकॉनिक’ असाव्यात
Published on

एसटीची बसस्थानके ‘आयकॉनिक’ करा ः शिंदे
ॲग्रोवन वृत्तसेवा

मुंबई : एसटी महामंडळाच्या जागांचा सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी) विकास करताना तेथे उभारण्यात येणारी नवीन बसस्थानके आणि इतर वास्तू केवळ आधुनिक सुविधांनी युक्त न राहता ‘आयकॉनिक’ आणि शहरांच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या असाव्यात. त्याचबरोबर नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध होतील, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

एसटी महामंडळाच्या जागा पीपीपी तत्त्वावर विकसित करण्यासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या आढावा बैठकीत श्री. शिंदे यांनी प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक या वेळी उपस्थित होते. एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांनी प्रकल्पांबाबत सादरीकरण केले.

१४७ स्थानकांचा पहिल्या टप्प्यात विकास

पहिल्या टप्प्यात १४७ बसस्थानके आणि एसटी महामंडळाच्या जागांचा पीपीपी तत्त्वावर विकास करण्यात येणार आहे. या ठिकाणी आधुनिक बस पोर्ट, प्रवासी सुविधा, कार्यालये, रुग्णालये, चित्रपटगृहे आणि नागरिक सेवा केंद्रे आदी सुविधा विकसित करण्याचे नियोजन आहे. तसेच सौरऊर्जा, इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग सुविधा आणि एसटीच्या इलेक्ट्रिक बससाठी स्वतंत्र चार्जिंग व्यवस्था उभारण्यात येणार आहे.

या मॉडेलमध्ये जमिनीची मालकी एसटी महामंडळाकडेच राहणार असून, जमीन कायमस्वरूपी हस्तांतरित केली जाणार नाही. विकासाचा १०० टक्के खर्च विकासकाकडून केला जाणार असल्याने शासन किंवा एसटी महामंडळावर बांधकामाचा आर्थिक भार येणार नसल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

गुजरात, कर्नाटकच्या सुविधांचा अभ्यास

महाराष्ट्रातील एसटी बसस्थानकांच्या पुनर्विकासासाठी गुजरातमधील अहमदाबाद आणि वडोदरा येथील आधुनिक बस पोर्टचा अभ्यास करण्यात आला आहे. त्याचबरोबर कर्नाटकातील केएसआरटीसीच्या प्रीमियम बस सेवा, ई-तिकीट, ऑनलाइन आरक्षण, प्रवासी सुविधा, कर्मचारी प्रोत्साहन आणि व्यवस्थापन पद्धतींचाही अभ्यास करण्यात आला आहे. बैठकीत बोरीवली आणि सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथील प्रकल्पांची संकल्पचित्रेही सादर करण्यात आली.

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, की एसटीच्या जागांचा विकास हा केवळ व्यावसायिक उत्पन्नाचा विषय न राहता प्रवाशांना आधुनिक सुविधा, शहरांना आकर्षक आणि दर्जेदार वास्तू तसेच महामंडळाला शाश्वत आर्थिक बळ देणारा ठरावा, या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com