एसटी अडकली दिवाळीच्या वाहतूक कोंडीत; प्रवाशांचे प्रचंड हाल

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 26 October 2019

वाहतूक कोंडीने एसटीचे वेळापत्रक कोलमडले 
- आठ ते बारा तास उशीर 
- प्रवाशांचे प्रचंड हाल 
- एसटी प्रशासन हतबल 

पुणे : पुण्याच्या प्रवेशद्वारावर नाशिक महामार्ग, नगर महामार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीत एस. टी. महामंडळाच्या बसेस अडकून पडल्याने उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात जाणाऱ्या शेकडो गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले. नाशिक, औरंगाबाद मार्गावरील बसला 8 ते 12 तासांचा विलंब झाला. प्रवासात असणारे नागरिक बसमध्ये अडकून पडलेच, शिवाय बसस्थानकांवर भर पावसात हजारो प्रवासांना ताटकळत उभे रहावे लागले. महिला लहान मुले, वृद्ध, सामान घेऊन बसची शोधाशोध करणाऱ्या पुरूषांचे प्रचंड हाल झाले. बसला विलंब झाला तरी त्या रद्द केल्या नाहीत असा दावा एस. टी. महामंडळाने केला असला तरी अनेकांनी आरक्षण रद्द केले. 

दिवाळीसाठी गावाकडे जाणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने एसटी महमंडळाने दरवर्षी प्रमाणेही यंदाही जादा बसची व्यवस्था केली. यंदा शिवाजीनगर, स्वारगेट येथून एकुण 1 हजार 800 बसेची व्यवस्था करण्यात आली. त्यामध्ये 1 हजार 250 बसेस या दिवाळी स्पेशल जादा बसेस होत्या. स्वारगेट येथून पश्‍चीम महाराष्ट्र, मुंबई व कोकण तर शिवाजीनगर येथून मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील बसची व्यवस्था करण्यात आली. ज्या बसचे आरक्षण आहे अशा विदर्भात व मराठवाड्यात जाणाऱ्या जादा बसेस यंदा वाकडेवाडी येथील बसस्थानकावरून सोडण्यात आल्या. 

शुक्रवारी नाशिक मार्गे पुण्यात येणाऱ्या बसेस आळेफाटा, चाकण, नारायणगाव, राजगुरूनगर, येथील वाहतूक कोंडीत अडकल्या. त्यामुळे नाशिक वरून जेणाऱ्या बस किमान 10 तास विलंबाने पुण्यात आल्या. मेट्रोच्या कामामुळे शिवाजीनगर भागातूनच बसस्थानकात येण्यास दोन तास लागले. असे 12 तास उशीर झाला. औरंगाबाद मार्गे येणाऱ्या बसेस शिक्रापूर, वाघोली, नगर रस्त्यावर अडकून पडल्याने त्या बसस्थानकात येण्यास किमान 7 ते 8 तास लागले. हे नियोजन बिघडल्याने आरक्षण केलेल्या प्रवाशांना ताकटकळ उभे रहावे लागले. वाहतूक कोंडीमुळे आम्ही हतबल झालो होते. मध्यरात्री अडीच तीन पर्यंत बस संबंधित मार्गावर पाठविण्याचे काम सुरू होते, असे आगारप्रमुख अनिल भिसे यांनी सांगितले. 

गावाकडे जाण्याची ओढ लागलेली असताना बस स्थानकावर तासन तास प्रवाशी अडकून पडले. पावसामुळे सर्वच चिखल झाल्याने प्रवाशांना बसायालाही जागा शिल्लक नव्हती. अनेकांनी आरक्षण रद्द केल्याने त्यांचे तिकीटाचे पूर्ण पैसे परत करण्याची नामुष्की एस. टी. महामंडळावर आली. 

आजही दोन तास उशीर 
शुक्रवारी प्रवाशांचे प्रचंड हाल झालेले असताना आज (शनिवारी) काही प्रमाणात दिलासा मिळाला. एस. टी. महामंडळाच्या बसेस दीड ते दोन तास उशीराने धावत आहेत. तसेच आज प्रवाशांचीही गर्दी निम्म्याने कमी झाली आहे, असे आगार प्रमुख ज्ञानेश्‍वर रणवरे यांनी सांगितले. 

दैनंदिन बस संख्या -600 
दिवाळीसाठी जादा बस - 1250 
नाशिक मार्गावरचा विलंब - 10 ते 12 तास 
औरंगाबाद मार्गावरचा विलंब - 7 ते 8 तास 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST schedule collapse Traffic in Pune City