एसटीचे निवारा शेड  हडपसरला कुलूपबंद 

kobal1.jpeg
kobal1.jpeg


पुणे : राज्य परिवहन महामंडळाकडून हडपसर येथील दोन्ही एसटी थांब्यांवर निवारा शेड उभारण्यात आले आहेत. मात्र चार महिने होऊनही ते नियंत्रकाअभावी कुलूपबंद आहेत. त्यामुळे प्रवाशांना अद्यापही येथे ऊन, वारा, पावसात थेट रस्त्यावरच उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. 


या ठिकाणाहून दररोज हजारो प्रवासी एसटीने प्रवास करत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने प्रवासी असूनही या ठिकाणी आवश्‍यक ती सुविधा एसटीकडून पुरविण्यात आलेली नाही, त्यामुळे प्रवाशांना उन्हातच उभे राहून प्रतीक्षा करावी लागत आहे. या ठिकाणी प्रवाशांसाठी निवारा शेड असावे, अशी मागणी अनेक दिवसांपासून त्यांच्याकडून होत आहे. ही मागणी लक्षात घेऊन परिवहन महामंडळाकडून सोलापूर महामार्गावर रविदर्शन येथे, तर सासवड मार्गावर सातववाडी येथे एसटी थांब्यावर निवारा शेड ठेवण्यात आलेले आहेत. मात्र, सोलापूर महामार्गावरील शेड चार महिने होऊनही नियंत्रक नसल्याने सुरू करण्यात आलेले नाही, तर सासवड रस्त्यावरील शेड खुले असूनही त्यामध्ये आवश्‍यक सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत, त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे दोन्हीही मार्गांवरील निवारा शेड म्हणजे "असून अडचण व नसून खोळंबा,' अशी अवस्था येथे अनुभवास येते. 

रविदर्शन येथे सुरवातीला प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेले नियंत्रक केबिन, एका निवृत्त कर्मचाऱ्याने उभारलेले निवारा शेड व सध्याचे नवीन शेड येथे मद्यपींसाठीचा अड्डा बनू लागले आहे. एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने तेथील बकालपणा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. 

तिकीट आरक्षणाची मागणी 
रविदर्शन येथील एसटी थांब्यावरून सोलापूर, लातूर भागात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे, त्यासाठी या ठिकाणाहून तिकीट आरक्षणाची सोय झाल्यास प्रवाशांचा वेळ, त्रास व पैसा वाचण्यास मदत होईल. त्यामुळे प्रवाशांनी येथे तिकीट आरक्षण सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. 


निवृत्ती रकमेतून उभारले शेड 
एसटीतील निवृत्त कर्मचारी दत्तात्रेय बारगुजे यांनी प्रवाशांचे होणारे हाल लक्षात घेऊन निवृत्तीनंतर मिळालेल्या काही रकमेतून येथे सहा महिन्यांपूर्वी स्वखर्चाने निवारा शेड उभारले आहे. एसटीचे शेड खुले नसल्याने याच शेडचा उपयोग सध्या प्रवाशांना होत आहे. 

""वाहतूक नियंत्रक नसल्यामुळे शेड सुरू करण्यात आले नसल्याचे म्हणणे चुकीचे आहे. वाकड, हिंजवडी येथील निवारा शेड सुरू झालेले आहेत. हडपसर येथील दोन्ही ठिकाणच्या शेडचे काम अपूर्ण असल्याने ते उघडण्यात आलेले नाहीत. दोन दिवसांत पाहणी करून या शेडचे काम पूर्ण केले जाईल, त्यानंतर लगेचच निवारा शेड खुले केले जाईल.'' 
- दीपक घोडे, विभागीय वाहतूक अधिकारी, राज्य परिवहन मंडळ 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com