ST Workers Strike - एसटी संपाचे स्टेटस ठेवले, ८ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटी संपाचे स्टेटस ठेवले, ८ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यात पुण्यातील ८ कर्मचाऱ्यांवर संपाबाबत व्हॉटसअॅप स्टेटस ठेवल्यानं कारवाई केली आहे.

एसटी संपाचे स्टेटस ठेवले, ८ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

दौंड : एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणखी चिघळण्याची शक्यता आहे. राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यात पुण्यातील ८ कर्मचाऱ्यांवर संपाबाबत व्हॉटसअॅप स्टेटस ठेवल्यानं कारवाई केली आहे. संप काळात व्हॉट्सअप ग्रुप व अन्य प्रसिध्दी माध्यमांद्वारे चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत दौंड एसटी आगारातील आठ कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबनाच्या काळात या कर्मचार्यांना फक्त अर्धा पगार व त्या अनुषंगाने भत्ते दिले जाणार आहेत.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एसटी) राज्य शासनामध्ये विलिनीकरण करण्याच्या मुख्य मागणीसाठी दौंड एसटी आगारातील १६३ कर्मचारी ८ नोव्हेंबर पासून संपात सहभागी झाले आहेत. त्यापैकी ५ चालक व ३ वाहक, असे एकूण ८ कर्मचार्यांना ११ नोव्हेंबर रोजी एका आदेशान्वये निलंबित करण्यात आले आहे. विभागीय वाहतूक अधीक्षक यांच्या स्वाक्षरीने हे आदेश काढण्यात आले आहेत. निलंबनाच्या आदेशात कामावर गैरहजर राहणे, इतर कर्मचार्यांना कामावर जाण्यास मज्जाव करणे, व्हॉट्सअप ग्रुप व इतर प्रसिध्दी माध्यमांतून चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा: परिवहन मंत्री दिशाभूल करताहेत; सदाभाऊंचा अनिल परबांवर घणाघात

आगारातील औद्योगिक शांतता भंग करण्याचा ठपका या कर्मचार्यांवर ठेवण्यात आला आहे. निलंबित कर्मचार्यांपैकी अनेकांना त्यांच्यावरील आरोप अमान्य आहेत. निलंबित कर्मचार्यांना स्वतःचे निर्दोषत्व सिध्द करण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.

निलंबनाच्या काळात दररोज सकाळी १० वाजता दौंड आगार व्यवस्थापक यांच्याकडे हजेरी लावण्याचे नमूद करण्यात आले आहे. आगार व्यवस्थापक यांच्या पूर्व परवानगी शिवाय मुख्यालय सोडून जाता येणार नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

loading image
go to top