
स्टँड-अप कॉमेडीची मराठीतही ‘हवा’
पुणे - ‘‘२०१५ मध्ये स्टँड-अप कॉमेडी करायला लागलो होतो. पण नोकरी सांभाळून शोज करणे कठीण जात होते. त्यामुळे २०१८ मध्ये नोकरी सोडून स्टँड-अप कॉमेडीकडे पूर्णवेळ व्यवसाय म्हणून वळलो. सुरुवातीला खूप अडथळे होते. नोकरीतील आर्थिक सुरक्षितता इथे नव्हती. महिन्याचा जेमतेम घरखर्च भागेल, एवढेच उत्पन्न मिळत होते. मात्र हळूहळू जम बसत गेला. आता माझी स्वतःची अशी ओळख तयार झाली आहे. महाराष्ट्रत विविध गावांमध्ये आता माझे शो होतात’’, ही कहाणी सांगत होता मंदार भिडे.
आजघडीला मराठीमध्ये सातत्याने स्टँड-अप कॉमेडी करणाऱ्या काही मोजक्या नावांमध्ये मंदारचे नाव आघाडीला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये स्टँड-अप कॉमेडी हा प्रकार भारतात रुजला होता. मात्र यात मराठी भाषेत स्टँड-अप कॉमेडी करणाऱ्यांची संख्या मर्यादित होती. मंदारसारख्या तरुणांनी धाडस करत स्टँड-अप कॉमेडीकडे वळण्याचे ठरवले आणि हळूहळू हा प्रकार मराठीत रुजवला. आता त्यांच्यामुळेच याकडे व्यवसाय म्हणून पाहण्याची प्रेरणा अनेक तरुण-तरुणींना मिळते आहे.
यातीलच एक असलेला पुष्कर बेंद्रे सांगतो, ‘‘मी स्टँड-अप कॉमेडी करायला सुरुवात केली, त्यावेळी पुण्यात त्यासाठी फारशा सुविधा नव्हत्या. त्यामुळे शो करण्यासाठी आम्हाला मुंबईला जावे लागायचे. पण काही मिनिटांसाठी एवढा प्रवास करणे परवडत नव्हते. म्हणून मग आम्ही पुण्यातच काम करायचे ठरवले. वेगवेगळ्या जागांच्या मालकांची भेट घेत आम्ही त्यांना शो घेण्यासाठी तयार केले. या शोजना प्रतिसाद मिळू लागल्यावर हळूहळू हा प्रकार स्थिरावला. आता मी स्वतः बरेच शो करतो, तसेच बाहेरच्या स्टँड-अप कॉमेडियन्सना देखील पुण्यात शोसाठी आमंत्रित करतो.’’
पुण्यात रुजतेय स्टँड-अप कॉमेडी
तरुणांमध्ये लोकप्रिय असलेला हा प्रकार आता शहरात बहरतो आहे. वेगवेगळे क्लब्ज, रेस्टॉरेंट्स, छोटेखानी सभागृह याठिकाणी स्टँड-अप कॉमेडीचे शो आयोजित केले जात आहेत. हिंदीतील लोकप्रिय असलेले झाकीर खान, अभिषेक उपमन्यू, कुणाल कामरा तसेच मराठीतील सारंग साठ्ये, सायली राऊत, ओमकार रेगे, सुशांत घाडगे आदी कलाकारांचे पुण्यात नियमित शोज होत असतात. कपिल अग्रवाल या तरुणाने तर ऑरेंज कॉमेडी क्लब हा स्टँड-अप कॉमेडीचा क्लबच सुरु केला आहे. ‘महा सोशल एंटरटेनमेंट बोर्ड’ हे नवे व्यासपीठही नुकतेच सुरू झाले आहे.
‘मराठीमुळे साधली जाते जवळीक’
हिंदी किंवा इंग्रजी भाषेतील स्टँड-अप करणारे अनेक कलाकार होते. मात्र मराठीतून स्टँड-अप कॉमेडी करताना भाषेचा अडसर दूर होतो. प्रेक्षकांच्या त्यांच्या रोजच्या जगण्याचे प्रतिबिंब त्यात उमटते. हे कलाकार सादर करत असलेले विनोद प्रेक्षकांना अधिक आपलेसे वाटतात. त्यामुळेच मराठीतील स्टँड-अप कॉमेडीचे लोकप्रियता वाढते आहे, असे निरीक्षण या कलाकारांनी नोंदवले.
Web Title: Stand Up Comedy Is Also Wanted In Marathi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..