मंचर येथून बँकेचे एकोणीस लाख रक्कम असलेले एटीएम चोरट्यांनी केले लंपास

मंचर येथून बँकेचे एकोणीस लाख रक्कम असलेले एटीएम चोरट्यांनी केले लंपास

मंचर : मंचर शहरात भरवस्तीत पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत भारतीय स्टेट बँकेचे एटीएम चोरट्यांनी ४०७ टेम्पोमध्ये टाकून चोरून नेले आहे. 19 लाख 3 हजार 800 रुपये रक्कम एटीएममध्ये होती. शुक्रवारी (ता .२९) पहाटे दहा मिनिटांत झालेला चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. विशेष म्हणजे येथे सुराक्षा रक्षक नव्हता. चोरी झाल्यानंतर हैद्राबाद येथे स्वयंचलित मोबाईलद्वारे कॉल गेला. त्यानंतर माहिती समजल्यानंतर मंचर पोलिस ताबडतोब घटनास्थळी पोहचले.

एटीएम चोरीची माहिती समजल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव, खेड व जुन्नर तालुक्यात सर्वत्र पोलिसांनी नाकेबंदी केली. पण चोरटे पोलिसांना गुंगारा देऊन पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. भारतीय स्टेट बँकेच्या मंचर शाखेच्या प्रवेशद्वाराशेजारी दोन एटीएम सहा वर्षांपासून आहेत. चोरी झालेल्या एटीएममध्ये ग्राहकांना पैसे भरण्याची सुविधा होती.

शेजारीच पैसे काढण्याचे एटीएम आहे. या एटीएममध्ये २४ लाख रुपये रक्कम होती. हे एटीएम वाचले आहे. चोरट्यांनी ४०७ टेम्पोला पट्टा लावला होता. मशीन ओढून टेम्पोमध्ये टाकले. टेम्पो पुणे-नाशिक रस्त्यावर पेठ गावाच्या दक्षिणेला असलेल्या युवराज हॉटेल समोर जैदवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एटीएम व खेड टोलनाक्याच्या अलीकडे हॉटेल शालीमारजवळ टेम्पो मिळाला आहे. वडगाव घेनंद (ता. खेड) येथील संतोष यादव यांच्या मालकीचा टेम्पो असून टेम्पो गुरुवारी (ता. २८) रात्री चोरीला गेल्याची फिर्याद यादव यांनी चाकण पोलीस ठाण्यात दाखल केली होती. चोरलेल्या टेम्पोचा वापर एटीएम चोरीसाठी केल्याचे पोलीस तपासात निष्पण झाले आहे.

पोलीस उपनिरीक्षक अर्जुन शिंदे, सागर खबाले, मंगेश लोखंडे, सुदर्शन माताडे यांनी टेम्पो व एटीएम हस्तगत केले आहे. पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंभाते, पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

दरम्यान २६ नोव्हेंबर २०२० रोजी मंचर शहरात मुळेवाडी रस्त्यावर असलेले अॅक्सिस बँक शाखेचे एटीएम पाच लाख रुपये रकमेसह एटीएम चोरट्यांनी स्कॉर्पिओ गाडीतून चोरून नेले होते. 'एटीएमची सुरक्षा बेभरवशाची' असा लेख 'सकाळ'मध्ये प्रसिध्द झाला होता. पण एटीएमच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमण्याविषयी भारतीय स्टेट बँकेसह अन्य बँकांनीही दुर्लक्ष केले. त्यामुळे पुन्हा एटीएम चोरी झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु झाली आहे.

शुक्रवारी (ता .२९) मंचर भारतीय स्टेट बँकेच्या एटीएममध्ये प्रवेश पहाटे तीन वाजून ३० मिनिटे. टेम्पोत मशीन टाकून रवाना तीन वाजून ४० मिनिटे चोरटे चार ते पाच जण, २५ ते ३० वय, मध्यम जाडीचे एका चोरट्याचा नारंगी रंगाचा शर्ट चेहरा निळ्या कपड्याने झाकलेला. भारतीय स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापक वंदना पांडे यांनी रोख रक्कम व एटीएमसह १९ लाख तीन हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची फिर्याद मंचर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

पुणे जिल्ह्यात बँका व एटीएमसाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुरक्षा रक्षक नेमावा. धोक्याचा इशारा देणारा सायरन बसवावा. चांगल्या दर्जाचे 'नाइट व्हर्जन' सीसीटीव्ही कँमेरे बसवावेत. जीपीस सिस्टीम एटीएममध्ये बसवावीत. याबाबत सर्व पोलीस ठाण्यांनी एटीएम असलेल्या बँका व पतसंस्थाना वेळोवेळी सूचना देऊन पत्र दिली आहेत. पण या सूचनांचे अनेक बँकाकडून पालन होत नाही. ही गंभीर बाब आहे. मंचर येथे स्टेट बँकेचे दोन एटीएम शेजारीशेजारी आहेत. पण सुरक्षा रक्षक नेमलेला नव्हता. एटीएम चोरीचे प्रकार रोखण्यासाठी सर्व बँकांच्या उच्चपदस्त अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सुरक्षा व्यवस्था सक्षम करण्याच्या लेखी सूचना दिल्या जातील. याबाबत अंबलबजावणी न करणाऱ्यांच्या विरोधात जबाबदारी निश्चित करून कायदेशीर कारवाईचा बडगा उचलला जाईल. -डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com