esakal | लसीकरणाला गती देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील : अजित पवार

बोलून बातमी शोधा

State government is trying to speed up vaccination Ajit Pawar

- आरोग्य सुविधांमध्ये कमतरता भासू नये यासाठी सरकार प्रयत्नशील

- कोरोनाची संभाव्य तिसरी लाट गृहीत धरून काटेकोर नियोजन

- ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारणीवर भर

- ग्रामीण आरोग्य यंत्रणेने सतर्क राहण्याची गरज

लसीकरणाला गती देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील : अजित पवार
sakal_logo
By
अनिल सावळे

पुणे : आरोग्य सुविधा वाढवणे, ऑक्सिजन पुरवठा, बेड, रेमिडिसिव्हीरची उपलब्धता यासोबतच कोरोनाबाधित रूग्णांना उपचार सुविधांमध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता भासणार नाही, यासाठी शासन स्तरावर सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. ‘कोरोना’ची संभाव्य तिसरी लाट गृहीत धरून काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. लसीकरणाला गती देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

पुण्यातील विधानभवन येथे शनिवारी (ता. 1) उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. पवार म्हणाले, ''कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन पुरवठ्यामध्ये कमतरता भासणार नाही, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णाला वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी सुविधांमध्ये तातडीने वाढ करावी. ग्रामीण भागात रूग्णसंख्या वाढू नये म्हणून सजग राहून नियोजन करणे आवश्यक आहे. आवश्यक तिथे खाटांची गरज, उपलब्धता आणि इतर सामग्रीसाठी सतत समन्वय ठेवावा, अशा सूचना पवार यांनी प्रशासनाला दिल्या. ''

हेही वाचा: केंद्राने आधी परदेशात लस देण्याची गरज नव्हती - उपमुख्यमंत्री

लसीकरण केंद्रांवर गर्दी नको :

राज्य सरकारने 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने आवश्यक निधीची तरतुद केली आहे. परंतु लसीची उपलब्धता ही मर्यादित असल्यामुळे नागरिकांनी लगेच लस केंद्रांवर गर्दी करू नये. कोविन ॲपवर नोंदणी केल्यानंतर जी तारीख आणि वेळ मिळेल त्या दिवशी जाऊन लस घ्यावी, असे आवाहन पवार यांनी केले. कोरोनाच्या संकटकाळात गरजूंना अन्नधान्य उपलब्ध व्हावे, यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना एक महिन्याचे मोफत अन्नधान्य वितरीत करण्यात येत आहे. जिल्ह्यातील हजारो गरजू कुटुंबांना त्याचा लाभ होईल, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा: कोरोनाविरुध्द एकजुटीने, निर्धाराने लढू : अजित पवार

''पुणे महापालिकेच्यावतीने कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.''

- मुरलीधर मोहोळ, महापौर

''लसीकरण नियोजन व्यवस्थितपणे होणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या समन्वयातून जनतेला अधिकाधिक चांगल्या आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात यावा.''

- गिरीश बापट, खासदार

''ग्रामीण भागात गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांबाबत त्यांच्या आरोग्यांची काळजी घेण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात यावे.''

- डॉ. अमोल कोल्हे, खासदार

''ऑक्सिजन पुरवठा, बेड उपलब्धता व रेमिडिसिव्हिर याबाबतचे नियोजन चांगले आहे. क्रियाशील रुग्णसंख्या घटते आहे, ही चांगली बाब आहे. पुढील कालावधीतही रुग्णसंख्या विचारात घेत नियोजन आवश्यक आहे.''

- श्रीरंग बारणे, खासदार

हेही वाचा: पुणे लोहमार्ग पोलिस विभागाने घडविले दातृत्व