Bhide Wada : राज्य सरकारकडून भिडे वाडा पुर्नविकासासाठी 50 कोटी रुपयांची तरतुद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

state government Provision of Rs 50 crore redevelopment of Bhide Wada  pune

Bhide Wada : राज्य सरकारकडून भिडे वाडा पुर्नविकासासाठी 50 कोटी रुपयांची तरतुद

पुणे : महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी मोठ्या कष्टातुन मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहीत करण्यासाठी भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा भरविली. मात्र आता याच भिडेवाड्याची दुरावस्था झाली असून तो मोडकळीस आला आहे.

भिडेवाड्याचे जतन करण्यासाठी संघटनांकडून सातत्याने आंदोलने केली जात होती. अखेर राज्य सरकारच्या गुरुवारी जाहीर झालेल्या अंर्थसंकल्पामध्ये भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकासाठी 50 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली. दरम्यान, त्यासाठी आत्तापर्यंत झटणाऱ्या विविध संघटनांनी राज्य सरकारच्या या निर्णयाबाबत संमिश्र प्रतिक्रीया दिल्या आहेत.

भिडे वाडा जतन करुन त्याचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, यासाठी मुलींची पहिली शाळा सार्वजनिक स्मारक निर्माण समिती, भिडे वाडा बचाव कृती समिती, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) यांच्यासह विविध सामाकि संस्था, संघटनांकडून मागील काही वर्षांपासून सातत्याने आंदोलने केली जात होती.

मात्र भिडे वाड्यासाठी राजकीय व्यक्तींकडून आश्‍वासनांपलिकडे काही प्राप्त होत नसल्याची कैफियत विविध संघटनांकडून मांडली जात होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डिसेंबर महिन्यात यासंदर्भात बैठक घेऊन राष्ट्रीय स्मारकासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्‍वासन दिले होते.

दरम्यान, गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्य सरकारचा अर्थसंकल्प सादर केला. त्यामध्ये त्यांनी पुण्यातील भिडे वाड्यासाठी 50 कोटी रुपयांची आर्थिक तरतुद करीत असल्याची घोषणा फडणवीस यांनी केली.

"भिडेवाड्यासाठी आताही जिल्हाधिकाऱ्यांकडे 2 कोटी रुपये पडून आहेत. केवळ पैशांच्या घोषणा करुन उपयोग नाही, तर भिडेवाड्याचे प्रकरण सध्या न्यायालयात आहे. त्याचे टायटल क्‍लेअर, भाडेकरुंचा प्रश्‍न प्रलंबित आहे. हे प्रश्‍न सोडवून स्मारकाचे काम सुरु व्हायला पाहीजे. त्यासाठी विशेष कार्यकारी अधिकाऱ्याची नेमणूक गरजेची आहे. त्याकडे दुर्लक्ष करुन केवळ पैशांच्या घोषणा करणे योग्य नाही.''

नितीन पवार, निमंत्रक, मुलींची पहिली शाळा सार्वजनिक स्मारक निर्माण समिती.

"" रिपब्लिकन पक्ष व डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्यावतीने भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक व्हावे, यासाठी आमच्यासह विविध सामाजिक संस्था, संघटनांनी मोर्चे, आंदोलने केली.या पार्श्‍वभुमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात भिडे वाडा स्मारकासाठी 50 कोटी रुपयांची तरतुद केली. त्याचे आम्ही स्वागत करतो.''

परशुराम वाडेकर, अध्यक्ष, पश्‍चिम महाराष्ट्र युवक आघाडी, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट)

टॅग्स :state government