अपघातग्रस्तासाठी राज्यमंत्र्यांची अलिशान गाडी बनली रुग्णवाहिका

सकाळ वृत्तसेवा
Friday, 31 July 2020

रस्त्याच्या कडेला बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेली व्यक्ती पाहताच राज्यमंत्र्यांनी क्षणाचाही विलंब न करता गाडी चालकाला वळविण्यास सांगितली आणि जखमीला गाडीत घेऊन हॉस्पिटलला जाण्यास सांगितले.

वालचंदनगर - राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या अलिशान गाडीतून एका अपघातग्रस्त व्यक्तीला रुग्णालयात नेण्यासाठी मदत झाल्यानं रुग्णाचे प्राण वाचले आहेत. भरणे यांच्या गाडीतून जंक्शन (ता.इंदापूर) येथे अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आलं होतं. जखमी व्यक्तीवर वेळेत उपचार झाल्यानं त्याच्या जीवाचा धोका टळला आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शुक्रवार (ता.३१) रोजी जंक्शन जवळ बारामती-इंदापूर राज्यमार्गावर सव्वासात  वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकीचा समोरासमोर अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातामध्ये विश्‍वनाथ सिताराम गोफणे (वय ५०, रा.सोनगाव,ता.बारामती) हे जखमी झाले होते. ते रस्त्यावरच बेशुद्ध अवस्थेमध्ये पडले होते. त्यांच्या डोक्याला मार लागल्यानं रक्तस्त्राव सुरु होता. तेव्हा अपघातानंतर रस्त्यावर बघ्यांची गर्दी झाली होती. अंधारामुळे येणारा प्रत्येक जण येणारा माणूस फक्त बघ्याची भूमिका घेत होता. यादरम्यान राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे पुण्याहून भरणेवाडीला घरी चालले होते.

हे वाचा - उरुळी कांचन परिसरात कोरोनाची पुन्हा उसळी

राज्यमंत्री भरणे यांनी रस्त्याच्या बाजूची गर्दी पाहून भरणे तातडीने गाडी थांबवली. रस्त्याच्या कडेला बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेली व्यक्ती पाहताच क्षणाचाही विलंब न करता गाडी चालकाला वळविण्यास सांगितली आणि जखमीला गाडीत घेऊन हॉस्पिटलला जाण्यास सांगितले. भरणे यांनी रस्त्यावर अपघातग्रस्ताची अशी मदत केल्यानं त्याचा जीव वाचला आहे. 

पुण्यातील बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दरम्यान, चालकाला गाडीतून जखमीला घेऊन रुग्णालयात जाण्यास सांगितल्यानंतर राज्यमंत्री भरणे हे दुचाकीवरून घरी परतले. भरणे यांनी त्यांच्या अलिशान गाडीची ऐनवेळी अशी रुग्णवाहिकेप्रमाणे सेवा दिल्यानं जखमीवर तातडीनं उपचार होण्यास मदत झाली. जखमी रुग्णाला बारामती इथं उपचारासाठी दाखल केले आहे. त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती ठीक असल्याची माहिती दिली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: state minister dattatray bharane help to injured person