#PmcIssues ना... माती ना... पाणी ना... निगा 

योगिराज प्रभुणे 
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

पुणे - राज्यात वनीकरणाचे क्षेत्र वाढविण्याच्या भाजप सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात पुण्यातील कारभाऱ्यांनी हिरिरीने फक्त भाग घेतला नाही, तर अवघ्या काही महिन्यांत तब्बल पाऊण लाख झाडे लावून आपली पाठ थोपटून घेतली. मात्र, लावलेल्या झाडांच्या मुळांवर ना माती आहे, ना पाणी. मग विचार करा या वृक्षारोपणाची गुणवत्ता काय असेल? 

पुणे - राज्यात वनीकरणाचे क्षेत्र वाढविण्याच्या भाजप सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात पुण्यातील कारभाऱ्यांनी हिरिरीने फक्त भाग घेतला नाही, तर अवघ्या काही महिन्यांत तब्बल पाऊण लाख झाडे लावून आपली पाठ थोपटून घेतली. मात्र, लावलेल्या झाडांच्या मुळांवर ना माती आहे, ना पाणी. मग विचार करा या वृक्षारोपणाची गुणवत्ता काय असेल? 

केंद्र आणि राज्यातील सत्ता स्थापन केल्यानंतर भाजप सरकारने काही महत्त्वाकांक्षी योजना आखल्या. त्यापैकी वृक्षारोपण ही एक आहे. राज्यात पाच वर्षांमध्ये पन्नास कोटी झाडे लावून ३३ टक्के वृक्षाच्छादित करण्याचा संकल्प सरकारने केला. त्या अंतर्गत राज्यात गेल्या महिन्याभरात १३ कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट निश्‍चित केले. त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांसह विविध सरकारी खात्यांवर सोपविण्यात आली. 

पाऊणलाख नवी झाडे
पुणे महापालिकेने ६० हजार ७५० झाडे लावण्याचा वाटा उचलावा, असा फतवा सरकारने काढला. त्यासाठी महापालिकेचे वेगवेगळे विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयांना वृक्षारोपणाचे उद्दिष्ट दिले होते. महापालिकेतील भाजपच्या कारभाऱ्यांनी उद्दिष्टापेक्षा १५ हजार झाडे अधिक लावून पाऊण लाखाचा टप्पा ओलांडल्याच्या हिशेबाचा कागद सरकारकडे धाडला. 

वृक्षारोपणाची औपचारिकता
नव्याने लावलेली रोपे पहिल्या ७२ तासांमध्ये कोमेजून जात असल्याचे चित्र राजाराम पूल ते म्हात्रे पुलाला जोडणाऱ्या राजा मंत्री पथावर दिसून येत आहे. रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. त्याच्या दुभाजकात वृक्षारोपणापुरते मातीचे ढिगारे टाकले आहेत. त्यात वरवर रोपे खोवून वृक्षारोपणाचा सोपस्कार पूर्ण केल्याचे दिसून येते. ही रोपे लावल्यानंतर त्याची योग्य निगा राखण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. वृक्षारोपणानंतर पाऊस पडलेला नाही. त्यामुळे नैसर्गिक स्रोतांतून रोपांना पाणी मिळाले नाहीच, पण महापालिकेला या रोपांचा विसर पडल्याने त्यांनीही पाणी दिले नाही. त्यामुळे पाणी नाही, माती नाही, की योग्य निगा नाही, अशा अवस्थेत ही झाडे जगण्यासाठी धडपडत आहेत. 

शहर पुढे, जिल्हा मागे
महापालिकेने वृक्षारोपणाचे दिलेले लक्ष्य पूर्ण केले, पण पुणे जिल्हा हा राज्यात सर्वांत मागे असल्याची माहिती सामाजिक वनीकरण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. जिल्ह्यामध्ये ७१ लाख १४ हजार झाडे लावण्याच्या उद्दिष्टांपैकी ४८ लाख ३३ रोपे लावण्यात आली.  

महापालिकेच्या हद्दीमध्ये ६० हजार ७५० रोपे लावण्याचे उद्दिष्ट होते. प्रशासनाचे वेगवेगळे विभाग, क्षेत्रीय कार्यालय, स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालये, गृहनिर्माण सोसायट्या यांच्या सहभागामुळे ८६ हजार ९९७ झाडे लावण्यात आली आहेत.
- अशोक घोरपडे, उद्यान अधीक्षक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Status of plantation in Pune