डिजिटल युगातही ‘स्टेनो’ला वाढती मागणी

पीतांबर लोहार
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

पिंपरी - टाइपरायटरची जागा संगणकाने घेतली. त्याच्या जोडीला स्मार्ट फोन आले आणि डिजिटल युग अवतरले. बालकांपासून निरक्षर आजोबांपर्यंत अनेक जण स्मार्ट फोन हाताळू लागले. त्यामध्ये ‘व्हॉइस टू टाइप’ यंत्रणा आली. या साधनांमुळे शासकीय, निमशासकीय वा खासगी कार्यालयांमधील ‘स्टेनो’ नामशेष झाली, असा जर कुणाचा समज असेल, तर तो साफ चुकीचा आहे. कारण, डिजिटल युगातही स्टेनोला मोठी मागणी आहे. देशभरात ‘स्टेनोग्राफर’ अर्थात लघुलेखकांच्या साडेसहा हजारांवर जागा रिक्‍त असून ते मिळेनासे झाले आहेत. राज्यात हे प्रमाण १७१४ असून पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातील ४२ आस्थापनांमधील ४१४ जागा रिक्त आहेत. 

नगरपालिका, महापालिका, कॅन्टोन्मेंट बोर्ड, पंचायत समित्या, जिल्हा परिषदांसह शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये लघुलेखक आवश्‍यक असतो. अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या बैठका, सर्वसाधारण सभा, विषय समित्यांच्या सभा, विधिमंडळ, मंत्रिमंडळाच्या बैठका, अधिवेशनांचे वृत्तान्त लिहिण्यासाठी लघुलेखन आवश्‍यक असते. तसेच, खासगी कंपन्यांमध्येही कार्यकारी सचिव, व्यक्तिगत सचिव, कार्यालयीन सहायक, स्वीय सहायक यांना लघुलेखन येणे आवश्‍यक असते, असे एम्प्लॉयमेंट कार्यालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले. 

लघुलेखन हे मराठीसह इंग्रजी आणि हिंदीतही शिकविले जाते. त्याचा प्रशिक्षण कालावधी सहा महिन्यांचा असून, तंत्रशिक्षण विभागातर्फे परीक्षा घेतली जाते. प्रतिमिनिट प्रतिव्यक्ती किती शब्द बोलू शकतो, त्यानुसार परीक्षा घेतली जाते. प्रतिमिनिट ६०, ८०, १००, १२० शब्द लिहिणे, अशा प्रमाणात परीक्षा असते. लघुलेखनासाठी दररोज तीन ते चार तास नियमित सराव व अभ्यास करावा लागतो. त्यासाठी पेन्सिलीचा वापर करावा लागतो. दहा वर्षांपासून शॉर्टहॅंड शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. सभावृत्तान्त अथवा भाषणांचा प्रत्येक शब्द लिहिण्यासाठी शॉर्टहॅंड उपयुक्त ठरते, असे प्रशिक्षक लतीश बलकवडे यांनी सांगितले.

तरुणांना संधी 
आमच्याकडे कंत्राटी स्टेनो आहेत. अधिकाऱ्यांच्या बैठकांचा वृत्तान्त लिहिण्यासाठी त्यांची आवश्‍यकता आहे. एक वेळ लिपिक नसले तरी चालेल. परंतु, स्टेनो आवश्‍यक असतात. सरकारी खात्यांमध्येही मोठ्या प्रमाणात स्टेनोच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे तरुणांना चांगली संधी आहे, असे एका निमशासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Steno Demand in Digital era