पुणे : घटस्फोटामुळे मुलांवर होतोय मानसिक आघात

सनील गाडेकर
रविवार, 12 जानेवारी 2020

- दुसऱ्या पालकांनी जबाबदारी न स्वीकारल्याने होतेय फरफट 

पुणे : घटस्फोट झाल्याने दुसरे लग्न केल्यानंतर आधीचा पती किंवा पत्नीच्या मुलांना दुसऱ्या आई अथवा वडिलांनी पालकत्वाची माया न दिल्याने त्यांच्यावर मानसिक आघात होतात. आई-वडील आपला तिरस्कार करतात, त्यांना आपण नकोसे आहोत, अशी भावना त्यांच्या मनात बालपणापासूनच निर्माण होते, अशी माहिती कौटुंबिक न्यायालयातील वकिलांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

30 ते 40 वयोगटांत विभक्त झालेल्यांना शक्‍यतो अपत्ये असतात. त्यामुळे आई-वडिलांच्या भांडणात त्यांची फरफट होते. त्या दोघांचा जरी घटस्फोट झाला तरी मुलांची आई-वडिलांबरोबर असलेली प्रेमाची नाळ तुटलेली नसते. दुर्दैवाने त्यांना कोणातरी एकाचाच सहवास लाभतो. कमी वयात त्यांना हा आघात सोसावा लागतो. त्यामुळे दूर झालेल्या आई किंवा वडिलांचे प्रेम दुसऱ्या पालकांकडून मिळेल, अशी आशा त्यांना असते, अशी माहिती कौटुंबिक न्यायालयातील वकिलांनी दिली. 

सर्वंच प्रकरणांत अशा मुलांना दुसऱ्या पालकांकडून पुरेसे प्रेम मिळतेच असे नाही. त्यामुळे ते आपल्या आई किंवा वडिलांवर दुसरे लग्न केले म्हणून नाराज होऊ लागतात. पालकांविषयी त्यांच्या मनात चीड निर्माण होते. पालकांकडून त्रास देण्यात आला, तर त्यांच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाल्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे एकटेपणा येणे, कुटुंब व समाजाविषयी राग निर्माण होणे, वाईट सवयी लागणे, बोलणे टाळणे, अभ्यासात लक्ष न देणे, शुल्लक गोष्टींवरून चिडणे, नको त्या गोष्टींचा ताण येणे, असे परिणाम त्या मुलांवर होतात, असे कौटुंबिक न्यायालयातील वकिलांनी सांगितले. 

मुलांना समजून घेण्याची गरज 

घटस्फोट पती-पत्नीचा होतो; परंतु मुलांचा आई-वडिलांबरोबर नाही. दोघांचाही मुलांवर जीव असेल व ते विभक्‍त झाले तर त्याचा सर्वाधिक परिमाण कोवळ्या वयाच्या मुलांवर होतो. कळत्या वयात आल्यानंतर त्यांना या सर्व गोष्टींचा खूप त्रास होतो. त्यामुळे दुसऱ्या लग्नानंतर संबंधित पालकांनी साथीदाराला असलेल्या मुलांना समजावून घेत त्यांची योग्य काळजी घेतली पाहिजे; अन्यथा त्यांच्यापुढे अनेक प्रश्‍न निर्माण होतात व त्यांची समाधानकारक उत्तरे मिळाले नाहीत, तर त्यांच्या मनात घालमेल सुरूच राहते, असे समुपदेशकांनी सांगितले. 

कोणत्याही मुलावर असा प्रसंग ओढावला, तर त्याचा सर्वांगीण विकास थांबतो. त्यांची बौद्धिक वाढही खुंटू शकते. त्यातून त्यांच्यावर मानसिक ताण येण्याची शक्‍यता असते. मुलांकडे लक्ष दिले नाहीतर त्यांचे भवितव्य धोक्‍यात येते. घरात पोषक वातावरण नसल्यास ते दुसरीकडे प्रेमाचा आधार शोधतात. 

- ऍड. प्रगती पाटील, वकील 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: stepchild getting Mentally Nervous