Pune | शेतीचा वीज पुरवठा खंडित करणे त्वरित थांबवा; जालिंदर कामठे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Electric-Supply-Cutting
शेतीचा वीज पुरवठा खंडित करणे त्वरित थांबवा; जालिंदर कामठे

शेतीचा वीज पुरवठा खंडित करणे त्वरित थांबवा; जालिंदर कामठे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्या सुरु आहेत. मात्र महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना विजेचे देयके न देताच, थेट रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) बंद करून कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा धडाका सुरु केला आहे. शेतीचा वीज पुरवठा खंडित करणे त्वरित थांबवा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे पश्‍चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी केली आहे.

या मागणीसाठी कामठे यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे पुणे ग्रामीणचे मुख्य अधिक्षक अभियंता सचिन तालेवार यांना निवेदन दिले आहे. कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित करणे त्वरित थांबवा, अन्यथा भाजपच्यावतीने महावितरणच्या कार्यालयांसमोर तीव्र आंदोलन करू, असा इशारा कामठे यांनी तालेवार यांना या निवेदनाद्वारे दिला आहे.

हेही वाचा: योग आणि आयुर्वेद संशोधनावरही भारताचा भर; धर्मेंद्र प्रधान

साधारणतः एका रोहित्रावरून किमान २५ कृषी पंपांना वीज पुरवठा केलेला असतो. यापैकी निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांना विजेची मागणी देयकेच अद्याप मिळालेली नाहीत. ज्या शेतकऱ्यांना ही देयके मिळाली, त्यांनी ती वेळेत भरणा केलेली आहेत. तरीही महावितरण कंपनीकडून ज्या शेतकऱ्यांनी वीज देयक पूर्ण भरले आहे, त्यांच्याही कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित केला जात आहे. महावितरणच्या या चुकीच्या धोरणामुळे देयके भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकाचेसुद्धा नाहक नुकसान होऊ लागले आहे. देयके भरण्यासाठी कुठलीही लेखी मागणीपत्रे न देता, शेतकऱ्यांना देयके भरण्याबाबत तोंडी सांगितले जात आहे, ही गंभीर बाब असल्याचा आरोप कामठे यांनी केला आहे. जिल्ह्यात सध्या गव्हाच्या पेरण्या, कांदा लागवड आणि उसाला पाणी देण्याचे काम सुरू आहे. महावितरण कंपनीकडून कुठल्याही शेतकऱ्यांना वेळेवर वीज देयकांच्या मागणीपत्राचे वाटप होत नसताना त्यांचा वीजपुरवठा खंडित करणे, कितपत योग्य आहे, असा सवाल त्यांनी केला आहे.

निवदेन देण्यासाठीच्या शिष्टमंडळात कामठे यांच्यासह जिल्हा सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे, रोहीदास उंद्रे, दादा सातव, मारुती चौरे, मारुती किंडरे आणि ऍड सचिन सावंत आदी उपस्थित होते.

loading image
go to top