वादळी पावसाच्या आपत्तीत सुरळीत वीजपुरवठ्यासाठी ‘प्रकाशदुतां’ची झुंज

Stormy-rain-in-Pune-district
Stormy-rain-in-Pune-district

पुणे कोरोना  -विषाणूच्या आपत्तीमध्ये सुरळीत वीजपुरवठ्यासाठी काम करणाऱ्या महावितरणच्या प्रकाशदुतांना अवकाळी पावसाने गेल्या दोन दिवसांत मोठे आव्हान दिले. वादळी पावसाच्या थैमानामुळे पुणे जिल्ह्याच्या अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र महावितरणचे अभियंते आणि जनमित्रांनी युद्धपातळीवर व अविश्रांत वीजयंत्रणा दुरुस्तीचे काम करून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी दिलेली झुंज यशस्वी झाली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे जिल्ह्याच्या अनेक भागात मंगळवारी (दि. 24) मध्यरात्रीनंतर जोरदार पावसाने वादळासह हजेरी दिली. पुणे व पिंपरी चिंचवड शहरामध्ये धो-धो पाऊस झाला. त्याआधी दोन दिवस सुमारे 37 अंशावर गेलेल्या तापमानामुळे तापलेल्या वीजयंत्रणेवर या अवकाळी पावसाचा परिणाम झाला आणि या दोन्ही शहराच्या विविध भागात वीजपुरवठा खंडित झाला. हा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे अभियंते व जनमित्रांनी पहाटेपासूनच दुरुस्तीचे काम सुरु केले. बहुतांश भागातील वीजपुरवठा सुरळीत केल्यानंतर पुन्हा दुपारी दीडनंतर सायंकाळपर्यंत पुणे व पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागांसह मुळशी, वेल्हे, बारामती, पुरंदर, खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव, शिरूर, दौंड, भोर व इंदापूर तालुक्यांमध्ये वादळी पावसाने अक्षरशः थैमान घातले. वीजयंत्रणेवर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्या. त्यामुळे वीजखांब व तारा जमीनदोस्त झाल्या. महामार्गांच्या बाजूला असलेल्या मोठमोठ्या जाहिरात फलकांचे बॅनर्स फाटून ते वीजतारांवर जाऊन अडकले.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 33 केव्ही, 22 केव्ही आणि 11 केव्ही या मुख्य वीजवाहिन्यांचे उन्हामुळे तापलेल्या डिस्क व पिन इन्सूलेटरवर पाणी पडल्याने त्या फुटल्या. पुणे शहरात विविध ठिकाणी यापूर्वी झालेल्या खोदकामांमध्ये महावितरणच्या भूमिगत वाहिन्या क्षतीग्रस्त झाल्या होत्या त्यात या पावसाचे पाणी गेल्याने अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला. या वादळी पावसामुळे पुणे जिल्ह्यात सुमारे 35 ते 40 वीजवाहिन्यांवरील वीजपुरवठा खंडित झाला. तसेच शहरी भागात साचलेले पावसाचे पाणी उतारावर असलेल्या फिडर पिलरमध्ये शिरल्याने वीजपुरवठा खंडित झाला.

      कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महावितरणचे अभियंता व जनमित्र सध्या वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्वाधिक प्राधान्य देत आहेत. मात्र त्यातच अवकाळी वादळी पावसामुळे या प्रकाशदुतांना अस्मानी संकटाला सामोरे जावे लागले. बुधवारी पहाटेच्या सुमारास अभियंते व जनमित्र वीजयंत्रणा दुरुस्तीच्या कामी लागले. सर्वप्रथम पर्यायी व्यवस्थेतून अनेक ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. ज्या ठिकाणी ही व्यवस्था नाही तेथे प्राधान्याने वीजयंत्रणेच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले. कोरोनामुळे दुरुस्तीच्या इतर कामांसाठी मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने जनमित्रांनी स्वतःच वीजयंत्रणेवर पडलेल्या फांद्या काढणे, वीजतारांना अडकलेले पातळ पत्रे, बॅनर्स काढणे, वीजखांब उभारणे, वीजतारा ओढणे, नादुरुस्त भूमिगत वीजवाहिन्यांसाठी खोदकाम आणि दुरुस्ती, फिडर पिलर्सची दुरुस्ती इत्यादी सर्व कामे करून अत्यंत संकटकाळात वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी जिगरबाज कामगिरी बजावली व महावितरणच्या ग्राहकसेवेचा प्रत्यय दिला.

ज्या भागातील वीजपुरवठा सुरळीत आहे तेथील अभियंता व जनमित्रांचे पथक आवश्यकतेनुसार दुसऱ्या ठिकाणी पाठविण्यात आले. विशेष म्हणजे बुधवारी रात्री 8 वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्वच मुख्य वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला होता. यात अधूनमधून पाऊस हजेरी देत असल्याने अनेकवेळा अडथळे आले. दुरुस्तीच्या कालावधीत काही ठिकाणी अभियंता व जनमित्रांना जेवणासाठी उसंत मिळू शकली नाही किंवा तशी सोयसुद्धा होऊ शकली नाही. पहाटेपासून कामावर असलेले अनेक अभियंते व कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतरच बुधवारी रात्री उशिरा घरी परतले.

येत्या दोन दिवसांत आणखी वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने महावितरणकडून सुरळीत वीजपुरवठ्यासाठी योग्य उपाययोजना केल्या जात आहेत. मुख्यत्वे वादळ व अवकाळी पावसामुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याने प्रथमतः पर्यायी वीजपुरवठ्याची व्यवस्था करण्यात येत आहे. मात्र हा पर्याय नसल्यास वीज यंत्रणेची दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com