esakal | राज्यात पावसाची दमदार कामगिरी; पुण्यात सर्वाधिक
sakal

बोलून बातमी शोधा

RainFall-Maharashtra

राज्यात पावसाची दमदार कामगिरी; पुण्यात सर्वाधिक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्रासह राजस्थान, गोवा या राज्यांमध्ये आणि अंदमान-निकोबार, लक्षद्वीप आणि दादरा-नगर-हवेली येथे पावसाने सरासरी ओलांडली आहे, असे हवामान खात्याने प्रसिद्ध केलेल्या नकाशातून स्पष्ट होते. देशातील सात राज्यांमध्ये पाऊस कमी पडला असून, 22 राज्यांमध्ये पावसाने सरासरी गाठल्याचे दिसून येते. 

देशात एक जून ते 2 सप्टेंबर या काळात पावसाची राज्यनिहाय माहिती हवामान खात्याने सोमवारी प्रसिद्ध केली. देशात पावसाळ्याच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये सरासरी 723.8 मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा प्रत्यक्षात 725.9 मिलिमीटर पाऊस पडला आहे. यात महाराष्ट्रात 21 टक्के पावसाची नोंद झाली. पावसाळ्याच्या या कालावधीत महाराष्ट्रात 841.8 मिलिमीटर पाऊस पडतो.

या वर्षी राज्यात 1020.5 मिलिमीटर पाऊस पडला. राजस्थानमध्ये 358.9 मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा तेथे 483.1 मिलिमीटर म्हणजे सरासरीच्या तुलनेत 35 टक्के पाऊस पडला. गोव्यात सरासरीपेक्षा 25 टक्के, अंदमान-निकोबार येथे 44 टक्के, लक्षद्वीपमध्ये 28 टक्के, तर दादरी-नगर-हवेली येथे सरासरीच्या तुलनेत 54 टक्के जास्त पाऊस पडल्याचे हवामान खात्याने सांगितले. 

दुष्काळी जिल्ह्यांना दिलासा 
राज्यातील मराठवाडा आणि पूर्व विदर्भातील दुष्काळी जिल्ह्यांना दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने दिलासा दिला. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भाने पावसाची सरासरी गाठली आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकण या हवामान उपविभागात मात्र सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. 

दृष्टिक्षेपात पाऊस 
हवामान उपविभाग ...... सरासरी पाऊस ........ प्रत्यक्षात पडलेला पाऊस (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) 

कोकण .................. 2554.7 ............ 3447.8 
मध्य महाराष्ट्र ........... 606.2 ............... 929.6 
मराठवाडा .............. 518.9 ................ 427.3 
विदर्भ ................... 803.2 ................ 775 

पुणे, नाशिक, नंदुरबारमध्ये सर्वाधिक पाऊस 
राज्यात सर्वाधिक पाऊस पुणे जिल्ह्यात पडला आहे. तेथे सरासरीपेक्षा 110 टक्के जास्त पावसाची नोंद झाली. नाशिक येथे 66 आणि नंदुरबार येथे 60 टक्के पाऊस पडला. या तीन जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत खूप जास्त (60 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त) पाऊस पडला असून पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये 20 ते 59 टक्के पाऊस नोंदल्याची माहिती देण्यात आली. 

राज्यातील पावसाचा अंदाज 
3 सप्टेंबर : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस 25 ते 50 टक्के पडणार. 
4 सप्टेंबर : मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी; तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात बऱ्याच ठिकाणी पावसाची 25 ते 50 टक्के शक्‍यता.

loading image
go to top