पुणे विद्यापीठ : परीक्षा विभागात विद्यार्थ्यांला बेदम मारहाण 

ब्रिजमोहन पाटील
Friday, 27 November 2020

-परीक्षा विभागात शुटींग केल्याने घडला प्रकार
-शिक्षा म्हणून कोंबडा करायला लावला
-पुणे विद्यापीठातील घटना
 

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागात तक्रार घेऊन गेलेल्या विद्यार्थ्याने परीक्षा संचालकांच्या केबिनमध्ये व्हिडिओ शूटिंग केल्याने त्यास विद्यापीठाच्या  सुरक्षारक्षकांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला असून, दोषींवर कारवाई करा अशी मागणी केली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आदित्य तांगडे पाटील असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. आदित्य हा गरवारे महाविद्यालयातून बीएससीच्या अंतिम वर्षात होता. त्याने आॅनलाईन परीक्षा दिली होती. त्यामध्ये त्याला सर्व विषयात चांगले गुण मिळाले पण एका विषयात शून्य गुण मिळाले आहेत. त्यामुळे त्याने परीक्षा विभागात १८ नोव्हेंबर रोजी तक्रार केली होती. आदित्यचा वारंगल येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये (एनआयटी) 'एमएससी'ला प्रवेश मिळालेला आहे. त्याला १ डिसेंबर पर्यंत गुणपत्रिका सादर करणे आवश्यक आहे. पण तो बीएस्सीला नापास झाल्याचे दाखविल्याने एक वर्ष वाया जाणार आहे. त्यामुळे लवकर गुणपत्रिका मिळावी यासाठी गेले काही दिवस विद्यापिठात खेटे मारत होता. 

बुधवारी दुपारी परीक्षा विभागातील काही अधिकाऱ्यांनी त्यास उडवाउडवीची उत्तरे दिल्याने तो परीक्षा संचालक डॉ. महेश काकडे यांना भेटण्यासाठी गेला. त्यावेळी त्याने मोबाईलमध्ये शूटिंग सुरू केल्याने महेश काकडे यांनी त्यास जाब विचारत त्यास बाहेर घेऊन जाण्यास सांगितले. 

सुरक्षारक्षकांनी त्यास मारहाण करत तळमजल्यावर आणले. त्याला जमिनीवर बसवून कोंबडा करायला लावला. संध्याकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत आदित्य तांगडे याच्यासोबत हा सर्व प्रकार घडला सुरू होता. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी त्याला त्याला गाडीमध्ये टाकून पुणे विद्यापीठाच्या बाहेर नेऊन सोडले. 
गुरुवारी सकाळी आदित्य आणि त्याच्या पालकांनी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराची कैफियत मांडली. त्यावेळी त्यांनी तुझे नुकसान होणार नाही असे आश्वासन आदित्यला दिले आहे. 
याबाबत कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

महाराष्ट्र स्टुडंट वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष वैभव एेडके म्हणाले, "परीक्षा विभागात तक्रार घेऊन गेलेल्या अनेक विद्यार्थ्यांना अरेरावीची सहन करावी लागत आहे. काल तर थेट मारहाण केली,  संबंधित अधिकारी व सुरक्षा रक्षकांवर कारवाई झाली पाहिजे. 

व्याजाच्या पैशांवरुन व्यावसायिकाचे अपहरण करुन बेदम मारहाण 

मला लवकर सुधारीत गुणपत्रिका मिळाली नाही तर माझे वर्ष वाया जाईल. पण माझे काम होत नसल्याने मी व्हिडिओ शुटींग केली. परीक्षा संचालकांनी सुरक्षा रक्षकांना मला बाहेर काढण्यास सांगितले. मला बेदम मारहाण केली, शिवाय कोंबडा ही करायला लावला. याबाबत कुलगुरू आणि प्र-कुलगुरू यांच्याकडे तक्रार केली असून, त्यांनी घडलेला प्रकार व्यवस्थित ऐकुन घेऊन मला लवकर गुणपत्रिका देण्याचे आश्वासन दिले आहे.-आदित्य तांगडे पाटील, विद्यार्थी 

परीक्षा विभागातील कामकाज हे गोपनीय असते त्यामुळे येथे व्हिडिओ शूटिंग करणे योग्य नाही. त्यामुळे या विद्यार्थ्याला केबिनमध्ये बाहेर घेऊन जाण्यास सुरक्षारक्षकांना सांगितले होते. त्याला खाली मारहाण झालेल्या प्रकाराबद्दल मला माहिती नाही.-डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा विभाग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Student beaten by Pune University security guards