व्याजाच्या पैशांवरुन व्यावसायिकाचे अपहरण करुन बेदम मारहाण 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 November 2020

अर्धनग्न करीत केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी 

पुणे ः व्यावसायासाठी घेतलेले कर्ज फेडल्यानंतरही व्याजाच्या रकमेसाठी व्यावसायिकाचे अपहरण करुन आरोपींनी त्यास कमरेच्या पट्ट्याने बेदम मारहाण केली. त्याचबरोबर व्यावसायिकाचा अर्धनग्न व्हिडीओ करुन तो व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी केली. हा धक्कादायक प्रकार बुधवारी सायंकाळी सहा वाजता विमाननगर व कळसगाव येथे घडला. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. 

"मी इथला भाई आहे' अशी धमकी देत मागितली खंडणी  

अविनाश कांबळे (वय 28, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी), तानाजी विठ्ठल जाधव (वय 30), तुषार हनुमंत शेळके (वय 22, दोघेही रा, रा. कळसगाव, विश्रांतवाडी) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. लोहगाव येथे राहणाऱ्या विकास कांबळे (वय 36) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी विकास कांबळे याचा रॉयल सोल्यूशन नावाचा टेली मार्केटींगचा व्यावसाय आहे. तर अविनाश कांबळे हा कामगार पुरवठा करण्याचे काम करतो. तसेच नागरीकांना खासगी सावकारी पद्धतीने कर्ज देतो. विकास कांबळे याने त्याच्या व्यावसायासाठी अविनाश कांबळे याच्याकडून पाच लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यांनी ते पाच लाख रुपये अविनाशला वेळोवेळी परत केले होते. त्यानंतरही अविनाशकडून विकास कांबळे यांच्याकडे वारंवार व्याजाच्या रकमेची मागणी केली जात होती. परंतु लॉकडाऊनमध्ये विकासच्या व्यवसायाला फटका बसला होता. त्यामुळे तो व्याजाची रक्कम देऊ शकला नव्हता.

नदीत बुडून पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

याचा राग मनात धरून बुधवारी अविनाश हा त्याचे साथीदार तानाजी जाधव व तुषार शेळके यांच्यासमवेत फिर्यादीच्या विमाननगर येथील अशोक प्लाझा येथील कार्यालयाखाली आला. त्याने विकासला खाली बोलावून घेतले. त्यानंतर त्यांनी विकासला दुचाकीवर बसवून कळसगावातील मोकळ्या मैदानात नेले. तेथे त्यास कपडे उतरविण्यास लावले. त्यानंतर तुषार व तानाजी यांनी कमरेच्या पट्ट्याने विकासला मारहाण केली. या मारहाणीचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्यात आले. तसेच पैसे न दिल्यास संबंधीत चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र आळेकर करीत आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kidnapping and beating a businessman for interest money