एज्युस्पायर प्रदर्शनाला प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

पुणे - शैक्षणिक विश्‍वातील विविध गोष्टींची माहिती एकाच छताखाली उपलब्ध करून देणाऱ्या ‘एज्युस्पायर’ या शैक्षणिक प्रदर्शनाला विद्यार्थी-पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

पुणे - शैक्षणिक विश्‍वातील विविध गोष्टींची माहिती एकाच छताखाली उपलब्ध करून देणाऱ्या ‘एज्युस्पायर’ या शैक्षणिक प्रदर्शनाला विद्यार्थी-पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’तर्फे (यिन) या प्रदर्शनाचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिरात केले होते.‘स्पेक्‍ट्रम ॲकॅडमी’ या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक होते; तर डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटी हे पॉवर्ड बाय प्रायोजक होते. पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, सृजन कॉलेज ऑफ डिझाईन, सुहाना मसाला, मॅक ॲनिमेशन व हॅशटॅग यांच्यासह पुणे स्मार्ट सिटीबाबत माहिती देणारा विशेष स्टॉलही प्रदर्शनात होता. ‘यिन’च्या काही प्रतिनिधींचे कौशल्यात्मक साहित्य पुणेकरांना पाहता आले. रोबो व नॅनो ड्रोन आदी तंत्राचा अनुभव देणारा इंडिया फर्स्ट रोबोटिक्‍स, डिजिटल आर्ट व्हीआई यांचाही स्टॉल येथे होता. पुणे स्मार्ट सिटी हे या प्रदर्शनाचे सहप्रायोजक होते. 

प्रदर्शनातील स्टॉलला तीन दिवस तरुणांनी भेट देऊन संस्थेविषयी माहिती घेतली, असे पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे रामदास जारे यांनी सांगितले. ‘हॅशटॅग’चे दिनेश सोळंकी यांनी नव्या स्टाइलच्या कपड्यांविषयी तरुणांनी चौकशी केल्याचे सांगितले. व्हिवो हेल्थकेअरचे राजकुमार चेंदकापरे आणि रायसोनी इन्स्टिट्यूटचे चंद्रशेखर चौधरी यांनी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले.

रचनात्मक काम करणाऱ्या तरुणाईचा गौरव
दोन्ही हात नसूनही क्रीडा क्षेत्रात भरारी घेणारा सुयश जाधव... दृष्टिहीन असूनही सीए बनणारा भूषण तोष्णीवाल, सामाजिक क्षेत्रात बदल घडविणारे प्रवीण निकम व वैभव वाघ... विज्ञान तंत्रज्ञानात नाव कमावणारे आदित्य पंडित व अमोल गुल्हाणे अन्‌ अभिनय क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणारा अभिनय बेर्डे ... एक्‍सलन्स इन यूथ लीडरशीपसाठी प्रवीण निकम अशा विविध क्षेत्रांतील तरुणांचा मंगळवारी ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’तर्फे (यिन) ‘यूथ इन्स्पिरेटर्स ॲवॉर्ड’ देऊन गौरव करण्यात  आला.  निलया ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट प्रस्तुत पॉवर्ड बाय हॅशटॅग या कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.  या वेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार दिलीप वळसे-पाटील, क्रीडा समीक्षक सुनंदन लेले,  निलया ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे निलय मेहता, ‘सुहाना मसाले’चे संचालक विशाल चोरडिया, डॉ. सतीश  देसाई व अभिनेत्री प्रिया बेर्डे उपस्थित होते. 

यिनच्या माध्यमातून युवा शक्तीला प्रेरणा देण्याचे काम केले जात आहे ही गोष्ट महत्त्वाची आहे. या पुरस्कारातून तरुणांना दिशा देण्याचे काम नक्कीच होईल. तरुणांच्या भविष्यासाठी ही कौतुकाची थाप खूप गरजेची आहे.
- विशाल चोरडिया,  संचालक, सुहाना मसाला

जीवनात नव्या गोष्टी करण्यासाठी स्वयंप्रेरित व्हावे. आज शिक्षणाचा विस्तार होत आहे. संधीही उपलब्ध असून, स्वनिर्मितीवर भर दिलात तर जीवनात काहीतरी करू 
शकाल.
- दिलीप वळसे-पाटील, आमदार

राजकीय जीवनात वावरताना आम्हाला अनेक अडचणी येतात. पण, आम्ही त्यातून शिकत असतो. आपणही तसेच केले पाहिजे. जीवनात काहीतरी करायचे असेल तर दुसऱ्यांच्या चांगल्या गोष्टी आत्मसात करा.
- श्रीरंग बारणे, खासदार

मागील पिढीने आपल्याला एक वारसा दिला आहे. तो आजच्या पिढीने पुढे न्यायला हवाच. पण, हा वारसा पुढे नेताना त्यात नावीन्यपूर्ण बदल कसे करता येईल यावर भर द्यायला शिका.
- डॉ. सतीश देसाई,  पुण्यभूषण फाउंडेशन

सामाजिक कार्याला आम्ही दुनियादारी म्हणतो. तीच दुनियादारी आपण आपल्या आयुष्यात जपली पाहिजे.
- वैभव वाघ

जलतरणात देशासाठी आणखी पदक कमविण्याचे स्वप्न आहे. त्यासाठी सराव सुरू असून, येत्या काळात देशाचे प्रतिनिधित्व करताना हा पुरस्कार मला नेहमीच प्रोत्साहित करेल.
- सुयश जाधव 

 मी खूप काही करू शकतो, हा विश्‍वास निर्माण करून वाटचाल करा आणि यश मिळवा. आपण नवीन गोष्टी आत्मसात करत वाटचाल केली पाहिजे.
- भूषण तोष्णीवाल

टेक्‍नॉलॉजीचा स्वीकार करून आपल्यातील संशोधक घडविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. देशात टेक्‍नॉलाजी वाढण्यासाठी  आपल्यातील संशोधक घडायला 
हवेत. 
- अमोल गुल्हाणे

Web Title: Student-Parents Spontaneous Response