साडेआठ कोटी विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका डीजी लॉकरमध्ये 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून 1989 पासून घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षा देणाऱ्या तब्बल साडेआठ कोटी विद्यार्थ्यांचा डेटा "डीजी लॉकर'मध्ये सेव्ह करून ठेवला आहे.

पुणे - महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून 1989 पासून घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षा देणाऱ्या तब्बल साडेआठ कोटी विद्यार्थ्यांचा डेटा "डीजी लॉकर'मध्ये सेव्ह करून ठेवला आहे. तसेच, ज्या विद्यार्थांना त्यांची सनद हवी आहे ती "ई-सनद' या पोर्टलवरून उपलब्ध होईल, अशी माहिती मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केंद्र सरकारने "डिजिटलायझेशन'ला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यामध्ये सरकारी कागदपत्रांची अधिकृत प्रत म्हणून "डीजी लॉकर' ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे कागदपत्रे सोबत घेऊन फिरण्याची गरज भासत नाही. याचाच वापर शिक्षण मंडळाने करून "नॅशनल ई गव्हर्नन्स डिव्हिजन'शी करार केला असून, गुणपत्रिकांचे डिजिटलायझेशन केले आहे. 

मंडळाने 1989 पासूनच्या दहावी-बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे या "डीजी लॉकर'मध्ये सेव्ह करून ठेवली आहेत. त्यामध्ये दहावीचे पाच कोटी 29 लाख, तर बारावीच्या तीन कोटी 47 लाख गुणपत्रिका "डिजिटल' स्वरूपात जतन करून ठेवल्या आहेत. 

प्रमाणपत्रे येथे उपलब्ध 
ही प्रमाणपत्रे https://boardmarksheet.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अनेक विद्यार्थी परदेशात नोकरीसाठी जात असतात, तसेच मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये रुजू होताना कंपन्यांना उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करणे शक्‍य आहे. याचा वापर करण्यासाठी विद्यार्थ्यांना https://digilocker.gov.in या वेबसाइटवर साइन-अप करून आपले आधार कार्ड लिंक करावे लागेल. त्यानंतर त्यांना त्यांचे डिजिटल प्रमाणपत्र उपलब्ध होईल, असे शकुंतला काळे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Student score sheet in DG Locker