"तुम्हे सबकुछ कैसे आता है' म्हणत इतर विद्यार्थ्यांकडून 'त्याला' मारहाण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 जानेवारी 2020

पुण्यात मात्र एका हुशार विद्यार्थ्यास त्याच्या वर्गातील सात विद्यार्थ्यांनी "तुम्हे सबकुछ कैसे आता है, तुम्हारे कारण टिचर हमें डांटती है' असे म्हणत जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पुणे : वर्गात हुशार असणाऱ्या विद्यार्थ्यावर अन्य विद्यार्थ्यांचा काहीसा राग असतो, तरीही ते त्याच्याशी "फ्रेंडशीप' करतात. पुण्यात मात्र एका हुशार विद्यार्थ्यास त्याच्या वर्गातील सात विद्यार्थ्यांनी "तुम्हे सबकुछ कैसे आता है, तुम्हारे कारण टिचर हमें डांटती है' असे म्हणत जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. केवळ तेवढ्यावरच न थांबता खिडकीच्या पडद्यामध्ये तोंड बांधून तुला गायब करुन टाकतो, अशी धमकीही दिली. ही घटना बुधवारी सकाळी दहा वाजता हडपसर परिसरातील एका शाळेत घडली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याप्रकरणी राशीद सिद्धीकी (वय 45, रा. हडपसर) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन सात अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा 15 वर्षीय मुलगा हडपसरच्या सय्यदनगर भागातील गुलाम अली नगरमध्ये असलेल्या एका शाळेमध्ये शिक्षण घेत आहे. फिर्यादी यांचा मुलगा अभ्यासात हुशार आहे. वर्गात शिक्षकांकडून विचारल्या जाणाऱ्या प्रश्‍नांची त्याच्याकडून योग्य उत्तरे दिली जातात. त्यामुळे फिर्यादीच्या मुलाच्या हुशारीचे कौतुक करत शिक्षक अन्य विद्यार्थ्यांना त्याच्यासारखे हुशार बनण्यास दटावत. त्याचा राग अन्य विद्यार्थ्यांना होता. त्यावरुनच बुधवारी (ता. 22) शाळेमध्ये जेवणाची सुट्टी झाली. त्यावेळी त्याच्या वर्गातील सात विद्यार्थ्यांनी त्यास शाळेच्या आवारात गाठले. त्यानंतर "तुम्हे सबकुछ कैसे आता है, "हर सवाल का जबाब तु क्‍यों देता है, तुम्हारे कारण टिचर हमें डांटते है' असे म्हणत त्यांनी फिर्यादींच्या मुलास शिवीगाळ केली. त्यानंतर त्यास धक्काबुक्की केली.

पुणे : गावठी पिस्तुलासह एकाला अटक

खिडकीच्या पडद्याच्या पाईपाने मारहाण केली. केवळ तेवढ्यावरच न थांबता पडद्यामध्ये तोंड गुंडाळूनही लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. तसेच तुला गायब करुन टाकू, अशा शब्दात धमकी दिली. या प्रकारामुळे फिर्यादी यांचा मुलगा घाबरला होता. त्यामुळे फिर्यादींनी त्याच्याकडे विचारणा केली, त्याने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेतली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: students beats other clever student in the class at Pune