
राज्यातील शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्याची शक्यता
पुणे : नियमितपणे शाळा सुरू झाल्या तरी विद्यार्थी मात्र गणवेशाविनाच असल्याचे दरवर्षी दिसणारे चित्र नवे नाही. परंतु राज्यातील शाळांमधील हे चित्र यंदा बदलण्याची चिन्हे आहेत. सर्व जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना गणवेश मिळावा, यासाठी राज्य सरकारने समग्र शिक्षा अभियानांतर्गत सर्व जिल्ह्यांसाठी तब्बल २१५ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी वितरित केल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. त्यामुळे किमान यंदा तरी शाळेच्या सुरवातीलाच विद्यार्थ्यांना गणवेश मिळतील, अशी आशा व्यक्त होत आहे.
राज्यातील विद्यार्थ्यांना शाळेच्या सुरवातीलाच गणवेश मिळावेत याबाबत शालेय शिक्षण विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना शाळा सुरू होताच दोन गणवेश मिळावेत, असे आदेश संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती गायकवाड यांनी ट्विटर आणि फेसबुकद्वारे दिली आहे. गायकवाड म्हणाल्या,‘‘हा निधी तालुकास्तरावरून संबंधित शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या खात्यात त्वरित पाठविला जावा, असे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा दर्जा चांगला असावा, अशा सूचनाही शासन स्तरावरून देण्यात आल्या आहेत.’’
समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीतील सर्व मुली आणि सर्व मागासवर्गीय मुलांना दरवर्षी दोन गणवेश मोफत दिले जातात. राज्यातील ३५ लाख ९२ हजार ९२१ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे, असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.
याशिवाय राज्यातील ६५ हजार ६२० शासकीय शाळांना पायाभूत गरजा भागविण्यासाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत दिल्या जाणाऱ्या संयुक्त शाळा अनुदानापोटी ८९.५९ कोटी रुपये देखील जिल्हा प्रशासनाला वर्ग केले आहेत. उन्हाळी सुटीनंतर विद्यार्थ्यांनी आनंदाने आणि तयारीनिशी शाळेत यावे, यासाठी शालेय शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे, असेही गायकवाड यांनी सांगितले.
Web Title: Students Likely Get Uniforms School Starts State Education Minister Announces Free Uniforms Varsha Gaikwad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..