esakal | विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची प्रतीक्षा!
sakal

बोलून बातमी शोधा

All schools except 10th-12th will be closed

विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची प्रतीक्षा!

sakal_logo
By
मिनाक्षी गुरव

पुणे : वर्षभरापासून ऑनलाइन शिक्षण...अभ्यास समजलाय की नाही, हे पाहण्यासाठी दरवेळी होणाऱ्या ‘टेस्ट’...आता अभ्यासक्रम पूर्णही झालायं, गुढीपाडवा झालायं, तरीही शाळा (ऑनलाइन) अजूनही सुरूच आहेत. त्यामुळे ‘उन्हाळ्याची सुटी कधी लागणार!!’ असा प्रश्न विद्यार्थी-पालक विचारू लागलेत.

हेही वाचा: पुणे : रुग्णांना मोठा दिलासा; अखेर शहराला मिळाले ५,९०० रेमडेसिव्हीर

दरवर्षी साधारणत: गुढीपाडवा झाल्यानंतर किंवा १० एप्रिलपासून शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या लागतात. परंतू यंदाचा एप्रिल महिना संपत आला तरीही शाळांनी उन्हाळ्याच्या सुट्या जाहीर न केल्याने विद्यार्थी-पालक संभ्रमात पडले आहेत. शाळांमध्ये अजूनही ऑनलाइन वर्ग भरविले जात आहेत. अर्थात या वर्गामधील विद्यार्थ्यांची हजेरी अवघ्या १० ते १५ टक्क्यांवर आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तेव्हापासून विद्यार्थ्यांची ही हजेरी झपाट्याने कमी झाली. आता अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झाला असला, तरी अद्याप शाळांना सुटी जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गात काय शिकवायचे; असा प्रश्न शिक्षकांसमोर उभा आहे. दरम्यान, काही शाळांनी विद्यार्थ्यांना ‘छोटा ब्रेक’ म्हणजेच काही दिवस अभ्यासाला सुटी देत आहेत. तर काही ठिकाणी शाळा सुरू ठेवायच्या म्हणून विविध उपक्रम राबवले जात आहेत.

नेमकी अडचण काय?

तर विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची सुट्टी कधीपासून द्यायची, याचे कोणतेही आदेश अद्याप शिक्षण विभागाने शाळांना दिले नसल्याने मुख्याध्यापक, शिक्षकांना ऑनलाइन शाळा सुरू ठेवावी लागत आहे. मुख्याध्यापक संघाच्या बैठकांमध्ये याबाबत सातत्याने चर्चा होत आहे. परंतू, अधिकृतरित्या सरकारकडून कोणतीही सूचना आली नसल्याने शाळांना उन्हाळ्यांच्या सुटीबाबत परस्पर निर्णय घेता येत नाहीये. दरम्यान ‘उन्हाळ्याची सुटी कधी लागणार!’, अशी विचारणा विद्यार्थी-पालकांकडून सातत्याने होत आहे. शिक्षण विभागाकडून कोणतेही आदेश न आल्याने विद्यार्थी-पालकांच्या अशा प्रश्नांना उत्तर देणे शिक्षकांना अवघड जात आहे.

शाळांनी काय पर्याय काढला?

विद्यार्थी वर्षभर ऑनलाइनद्वारे अभ्यास करत आहेत. राज्य सरकारच्या निर्णयाप्रमाणे विद्यार्थ्यांची वर्गोन्नती होणार असली, तरी त्याचा निकाल (आतापर्यंत झालेल्या टेस्ट वरून) आणि प्रगतीपुस्तक पालकांना द्यावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हे प्रगतीपुस्तक मे पर्यंत पूर्ण करावे, असे मुख्याध्यापकांनी संघाने ठरविले असल्याचे भावे हायस्कूलचे मुख्याध्यापक रोहिदास भारमळ यांनी सांगितले.

शिक्षण विभागाचं म्हणणं काय?

‘‘शाळा उन्हाळ्याच्या सुट्या कधीपासून द्यायच्या, याबाबत अद्याप राज्य सरकारने कोणतेही आदेश दिलेले नाहीत’’, असं प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितलं.