'एनएसएस'च्या विद्यार्थ्यांचे असेही कार्य...

डॉ. संदेश शहा
Wednesday, 22 April 2020

इंदापूर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे 56 स्वयंसेवक कोरोना मुक्तीसाठी आरोग्यदूत म्हणून काम करीत आहेत.

इंदापूर : इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी 700 मास्क, 100 लिटर सॅनिटायझर तसेच कोरोना जनजागृतीसाठी सोशल मीडियावर प्रबोधनात्मक दृकश्राव्य ध्वनिफिती तयार केल्याची माहिती इंदापूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक प्रा. गौतम यादव यांनी दिली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्राचार्य डॉ. चाकणे पुढे म्हणाले, इंदापूर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे 56 स्वयंसेवक कोरोना मुक्तीसाठी आरोग्यदूत म्हणून काम करीत आहेत. पैकी तीन स्वयंसेवकांनी 100 लिटर सॅनीटायझर तयार करून ते इंदापूर नगरपरिषदेकडे सुपूर्त केले. 15 स्वयंसेवकांनी ग्रामीण भागांमधील प्रत्येकी दहा कुटुंबे दत्तक घेऊन त्यांना कोरोना विषाणूची माहिती सांगितली.

काही विद्यार्थ्यांनी पोस्ट तयार केल्या तर काही विद्यार्थ्यांनी याबाबतचे व्हिडिओ तयार करुन आपआपल्या भागात प्रबोधन केले आहे. कोरोना पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरीच राहणे आवश्यक असून, अत्यावश्यक सेवेसाठी सोशल डिस्टन्स तसेच मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे.

त्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तसेच नागरिकांना मास्कचा वापर करता यावा, यासाठी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, संस्थेच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव मुकुंद शहा व संचालक मंडळाच्या  मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थ्यांनी घरच्या घरी मास्क तयार करून नागरिकांसाठी उपलब्ध केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students of NSS give contribution for Making 700 Masks