जलसंधारण कामात विद्यार्थ्यांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 मे 2018

पुणे : राज्यातील गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील सुमारे चार हजार विद्यार्थी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जलसंधारणाच्या कामात श्रमदान करणार आहेत. पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यांतील 13 गावांमधील श्रमदानात हे विद्यार्थी मंगळवारी (ता. 1) सहभागी होणार आहेत.

पुणे : राज्यातील गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील सुमारे चार हजार विद्यार्थी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जलसंधारणाच्या कामात श्रमदान करणार आहेत. पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यांतील 13 गावांमधील श्रमदानात हे विद्यार्थी मंगळवारी (ता. 1) सहभागी होणार आहेत.

राज्यात शेकडो गावांमध्ये पाणी फाउंडेशनच्या वतीने जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने जवळपास चार हजार विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होणार आहेत. जलसंधारणाच्या कामासाठी विद्यापीठाने जवळपास 50 गावांची यादी केली आहे. मात्र, महाराष्ट्रदिनी केवळ एका दिवसासाठी 13 गावांमध्ये विद्यार्थी श्रमदान करणार आहेत. या गावांमध्ये गावकऱ्यांसमवेत सामूहिक श्रमदानाच्या उपक्रमात महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी होतील.

या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात सातदिवसीय राज्यस्तरीय श्रमसंस्कार शिबिरात विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील 50 गावांमध्ये जलसंधारणाचे निवासी शिबिर आयोजित केले आहे. दोन ते तीन महाविद्यालयांतील मिळून शंभर विद्यार्थी आणि तीन प्राध्यापक असे गट केले आहेत. त्याप्रमाणे गावा-गावांमध्ये निवासी शिबिरे घेण्यात येतील. गावकऱ्यांसमवेत जलसंधारणाची प्रत्यक्ष कामे करणे आणि त्यासंदर्भात जनजागृती करणे, असे उपक्रम शिबिरात हाती घेतले जातील. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील 450 महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना कार्यरत असून, त्यातील अडीचशे महाविद्यालये जलसंधारणाच्या उपक्रमात सहभागी होतील, असे विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रभाकर देसाई यांनी सांगितले.

पुरंदर तालुक्‍यातील वाघापूर गावात 5 ते 11 मेदरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय श्रमसंस्कार शिबिरात शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. शिबिरामध्ये वेगवेगळ्या महाविद्यालयांतील दोन विद्यार्थी आणि दोन विद्यार्थिनी सहभागी होऊन जलसंधारणासाठी श्रमदान करणार आहेत. जलसंधारणाच्या कामाची माहिती व्हावी, यासाठी विद्यापीठामार्फत मागील आठवड्यात कार्यशाळा घेण्यात आली. त्यात पाणी अडविण्यासाठी आणि जिरविण्यासाठी सम चर कसे खोदायचे, याचे प्रशिक्षण देण्यात आले.
- प्रभाकर वराडे, कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना, मॉडर्न महाविद्यालय (शिवाजीनगर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students participate in water conservation works