डिप्लोमाला अॅडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांनो, ३० सप्टेंबरपर्यंत दाखल करा प्रवेश अर्ज!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 September 2020

सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थी आणि पालकांना शाळांकडून शैक्षणिक कागदपत्रे तसेच शासकीय कार्यालयांमधून दाखले मिळवण्यासाठी विलंब होत आहे.

पुणे : दहावी आणि बारावीनंतरच्या पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेत ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी, तसेच पडताळणी करण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत अर्ज करू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज करण्याची संधी मिळू शकणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तंत्रशिक्षण संचालनालयाकडून (डीटीई) दहावीनंतरच्या पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रम, तसेच बारावीनंतरच्या औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी), हॉटेल व्यवस्थापन व खाद्यपेय व्यवस्था तंत्रज्ञान (हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी) सरफेस कोटींग टेक्नॉलॉजी, अशा पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया ऑगस्टपासून राबविण्यात येत आहे. मात्र, सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थी आणि पालकांना शाळांकडून शैक्षणिक कागदपत्रे तसेच शासकीय कार्यालयांमधून दाखले मिळवण्यासाठी विलंब होत आहे.

प्रवेश प्रक्रियेत राखीव प्रवर्गातून अर्ज भरण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे एकूण परिस्थितीचा विचार करून डीटीईने प्रवेश अर्ज करण्याची मुदत वाढवून द्यावी; तसेच राखीव प्रवर्गातून प्रवेश घेण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना कागदपत्रे व दाखले जमा करण्यासाठी कालावधी वाढवून देण्याची मागणी पालकांकडून सातत्याने करण्यात येत होती. त्याची दखल घेत डीटीईने अर्ज सादर करण्यास पुन्हा एकदा मुदत वाढवून दिली आहे. 

'फर्स्ट इयर' सुरू होणार नोव्हेंबरपासून; 'यूजीसी'नं वेळापत्रक केलं जाहीर!

पदविका अभ्यासक्रमसाठी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदत आहे. तसेच याच कालावधीत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चिती (ई-स्क्रुटनी/ प्रत्यक्ष स्क्रुटनी) करावी लागणार आहे. या प्रवेश प्रक्रियेच्या कॅप व्यतिरिक्त जागांसाठी ऑनलाइन नोंदणी व कागदपत्रांची पडताळणी, अर्ज निश्चिती करणे या प्रक्रिया प्रवेशाच्या अंतिम तारखेपर्यंत (कट ऑफ जाहीर होईपर्यंत) सुरू ठेवले जाईल. मात्र, ३० सप्टेंबरनंतर ई-स्क्रुटनीद्वारे किंवा प्रत्यक्ष स्क्रुटनीद्वारे नोंद होणारे, पडताळणी व निश्चित होणारे अर्ज संस्था स्तरावरील व कॅप व्यतिरिक्त जागांसाठीच विचारात घेतले जाणार आहेत.

दरम्यान, तात्पुरती गुणवत्ता यादी ३ ऑक्टोबर रोजी, तर अंतिम गुणवत्ता यादी ८ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे, अशी माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. 

यंदा नवरात्र उत्सवात रास-दांडिया नाहीच; तरुण-तरुणींच्या आनंदावर फेरले पाणी​

दहावी-बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक :

प्रवेश प्रक्रिया : कालावधी
- अर्ज छाननीची योग्य पद्धत निवडून ऑनलाइन अर्ज करणे, कागदपत्रांच्या छायांकित प्रती अपलोड करणे : ३० सप्टेंबर
- प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी, अर्ज भरल्याची निश्चिती करणे ((ई-स्क्रुटनी/ प्रत्यक्ष स्क्रुटनी) : ३० सप्टेंबर
- तात्पुरती गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे : ३ ऑक्टोबर
- तात्पुरती गुणवत्ता यादीमध्ये तक्रार असल्यास त्या सादर करणे : ४ ते ६ ऑक्टोबर
- अंतिम गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे : ८ ऑक्टोबर

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students seeking admission to diploma submit the application form by September 30